अमळनेर:– आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व्यावसायिक शेती करत राजवड या गावाने नेहमीच शेतीबाबत प्रेरणा दिली आहे. या गावाने वनशेती, वृक्ष लावगड-संगोपन, दारूबंदी, ग्रामस्वच्छता, शैक्षणिक जनजागृती, वृक्षतोड बंदी, राज्य स्तरावरील आदर्श गाव असे विविध शासकीय पुरस्कार पदरी पाडून घेतले. त्यानंतर पुन्हा येथीलच प्रयोगशील शेतकरी नीळकंठ दगडू पाटील यांना २०२१ चा शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त झाला.
पाटील दाम्पत्याचा मुंबई राजभवनात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. राज्य शासनाच्या पुरस्काराची परंपरा नीळकंठ पाटील यांनी कायम ठेवली असून पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्याच्या कृषी सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या सोहळ्यात शेतीनिष्ठ पुरस्कार नीलकंठ पाटील यांनी पत्नी लोकनियुक्त सरपंच पुष्पलता नीलकंठ पाटील यांच्या समवेत स्वीकारला. या पुरस्कारामुळे राजवड गावाने पुरस्काराची परंपरा कायम ठेवल्याचे म्हटले जात आहे. राज्य आदर्श ग्राम पुरस्कारही प्राप्त राजवडच्या शिरपेचात पुन्हा मानाचा तुरा रोवला गेला आहे