
अंत्यसंस्कारासाठी अपुरे सरण, कर्मचारी नसल्याने नातेवाईकांची परवड होत असल्याचा आरोप…
अमळनेर – मृत्यू हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील आणि अंतिम टप्पा मानला जातो. मात्र अमळनेर येथील अमरधाम स्मशानभूमीत सुरू असलेल्या निष्काळजी आणि अमानुष कारभारामुळे प्रभाग क्र. ३ च्या नगरसेविका श्रीमती शोभाबाई गढरे यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला सुजान नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
अंत्यसंस्कारासाठी अपुरे सरण दिल्याने मृतदेह पूर्णपणे जळत नसून, अर्धवट जळालेल्या अवशेषांची भटक्या कुत्र्यांकडून विटंबना होत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अमरधामात अंत्यविधीसाठी अत्यल्प प्रमाणात गोवऱ्या व सरण उपलब्ध करून दिले जात आहे. मृतदेह पूर्ण जळण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक वेळा अंत्यसंस्कार अपूर्ण राहतात. काही ठिकाणी मृतदेह पूर्ण जळावा यासाठी तूप किंवा इतर साहित्याचा वापर केला जातो, मात्र येथे अशा कोणत्याही सुविधेचा अभाव असल्याचा आरोप करण्यात येत आहे. परिणामी केवळ औपचारिकता म्हणून अंत्यसंस्कार उरकले जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.
याहूनही गंभीर बाब म्हणजे स्मशानभूमीत कोणताही कायमस्वरूपी कर्मचारी किंवा कामगार उपलब्ध नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे दुःखाच्या प्रसंगी आलेल्या कुटुंबीयांनाच सरण रचण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत सर्व कामे स्वतः करावी लागत आहेत. पालिका प्रशासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
अपुरे सरण आणि व्यवस्थेच्या अभावामुळे अर्धवट जळालेले मृतदेह रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांकडून फाडले जात असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. दुसऱ्या दिवशी अस्थी संकलनासाठी येणाऱ्या नागरिकांना ही विदारक दृश्ये पाहावी लागत असून, त्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या जात आहेत.या संपूर्ण प्रकारामुळे पालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्मशानभूमीसारख्या पवित्र आणि संवेदनशील ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात असून, नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
“नगराध्यक्षांनी मौन सोडावे; जबाबदारीपासून पळ काढू नये”
“शहरातील सर्वात संवेदनशील ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. नगराध्यक्षांनी या प्रश्नावर मौन बाळगणे अयोग्य असून त्यांनी तातडीने हस्तक्षेप करून ठोस उपाययोजना कराव्यात.”
— नगरसेविका शोभाबाई गढरे (प्रभाग क्र. ३)
“मृतांचाही सन्मान राखला जात नसेल, तर जिवंतांच्या सुरक्षिततेची काय अपेक्षा?”
“अमरधामसारख्या पवित्र ठिकाणीही अशी अमानुष अवस्था असेल, तर ही केवळ निष्काळजीपणा नाही तर संवेदनशून्यता आहे. वारंवार असे प्रकार घडत असताना प्रशासन गप्प का आहे, हा खरा प्रश्न आहे.”
— दुर्गेश पाटील, नागरिक (शनीपेठ)
मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांनी दिली भेट…
सध्या अमरधामच्या मुख्य गेटचे बांधकाम सुरू असून ठेकेदाराला सूचना देऊन तात्काळ तात्पुरत्या स्वरूपात पत्राचे गेट लावण्यास सांगितले असून जेणेकरून कुत्रे आत जाणार नाहीत. तसेच एका कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नेमणूक केली आहे. त्याचबरोबर संपूर्ण अमरधाम परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची कारवाई लगेचच करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी सांगितले.



