
अमळनेर : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अमळनेर तालुक्यातील मुदत संपलेल्या व मुदत संपणाऱ्या एकूण ८० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
या अनुषंगाने तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी विशेष ग्रामसभांद्वारे आरक्षण सोडत प्रक्रिया पार पाडण्यासाठी विविध अधिकाऱ्यांची प्राधिकृत अधिकारी व सहाय्यक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.राज्य निवडणूक आयोगाच्या २५ मे २०२६ रोजीच्या आदेशानुसार सन २०२४ ते २०२५ दरम्यान मुदत संपलेल्या १३ ग्रामपंचायती तसेच जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ६७ ग्रामपंचायती अशा एकूण ८० ग्रामपंचायतींसाठी सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रम लागू करण्यात आला आहे.तालुक्यातील मालपूर, धार, निसर्डी, रणाईचे, फाफोरे, हिंगोणे, अंचलवाडी, शिरूड, नांद्री, पातोंडा, दापोरी, सावखेडा, शहापूर, तांदळी, एकतास, करणखेडे, पाडळसे, बोहरे, देवगाव, पिळोदे, गांधली, गडखांब, सोनखेडी, टाकरखेडे, , पळासदळे, सारबेटे, रामेश्वर, चुनोने, एकरुखी, मुडी, पिंगळवाडे, मेहेरगाव, सात्री, निंभोरा, कलाली, गलवाडे,, पिंपरी, धानोरा, वासरे, पाडसे, लोण, खडके, आर्डी, तळवाडे, आटाळे, मांडळ, जवखेडे आदी ग्रामपंचायतींसाठी ११ व १२ जून रोजी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे.आरक्षण प्रस्तावांची तपासणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून १२ जूनपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व नियुक्त प्राधिकृत अधिकाऱ्यांची बैठक ८ जून रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आली.ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकाऱ्यांना विशेष ग्रामसभा वेळेत घेण्याचे आणि आरक्षण सोडत प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित ग्रामसभांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अमळनेर व मारवड पोलिस ठाण्यांमार्फत आवश्यक पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.दरम्यान, आरक्षण सोडतीची संपूर्ण प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार पार पाडून त्याचा अहवाल, इतिवृत्त व मूळ कागदपत्रे तीन प्रतींमध्ये तहसील कार्यालयात सादर करण्याच्या सूचना तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी दिल्या आहेत.



