*अमळनेर : नगरपालिकेच्या गांधली येथील जलशुद्धीकरण केंद्रावरून पाईप फोडून बेकायदेशीर नळ कनेक्शन काढणाऱ्या खाजगी व पालिकेच्या प्लम्बर सह त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास नकार देणाऱ्या कर्मचार्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.
याबाबत पालिकेचे गांधली येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील सुपरवायझर बारकू कृष्णा सोनवणे यांनी फिर्याद दिली की , ६ एप्रिल रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास जलकुंभाच्या मुख्य आउटलेट मधून शासकीय परवानगी शिवाय कोणतीही पावती न फाडता मंजुरी न घेता एक इंची नळ कनेक्शन काढून नगरपालिकेच्या मालमत्तेचे नुकसान व पाणी चोरण्याचा प्रकार निदर्शनास आला. अधिक चौकशी केली असता खाजगी प्लम्बर जावेद कमरोद्दीन शेख , व पालिकेचे कर्मचारी कमरोद्दीन शेख हुसेन दोन्ही राहणार मेहतर कॉलनी यांनी हा प्रकार केल्याचे निदर्शनास आले. मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना हा प्रकार कळताच त्यांनी तत्परतेने राजेंद्र काशिनाथ हडपे रा अयोध्यानगर याना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मात्र हडपे यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार देऊन टाळाटाळ केली. म्हणून मुख्याधिकारी शिंदे यांनी कर्तव्य तत्परता दाखवत हडपे यांच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्याबाबत बारकू सोनवणे याना आदेश दिले. म्हणून जावेद आणि कमरोद्दीन यांच्याविरुद्ध शासकीय पाणी पुरवठ्यात अडथळा आणणे ,चोरी करणे म्हणून भारतीय न्यायासंहिता कलम ६२ व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले म्हणून अधिनियम १९८४ चे कलम ३ , ३(५) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला तर राजेंद्र हडपे यांच्याविरुद्ध वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केला म्हणून भारतीय न्याय संहिता कलम २२३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.
