
अमळनेर:- तालुक्यातील मंगरूळ येथील जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेली पाणी पुरवठा योजना प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठवला आहे. सुमारे ५ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती.

अमळनेर तालुक्यातील मंगरूळ हे मोठे गाव असून या गावाला बोरी नदीवरून आठ ते दहा किमी अंतरावरून पाणी आणले जाते. उन्हाळ्यात पाणी टंचाई भासत असल्याने मंत्री अनिल पाटील व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने सुमारे ४ कोटी ९७ लाख रुपयांची फिल्टर प्लांट सह पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. ग्रामपंचायतीचा ठराव करून सर्वे करून पारोळा तालुक्यातील भिलाली येथून बोरी नदीच्या बंधाऱ्यात इंटेक वेल व जॅक वेल घेऊन पाईप लाईन टाकून गावाला पाणी आणण्यात येणार होते. ३१ जानेवारी २०२३ रोजी योजनेचा कार्यारंभ आदेशही देण्यात आले होते. मात्र गावकऱ्यांनी पाणी पुरवठा तापी नदीवरूनच करण्यात यावा यासाठी आग्रह केल्याने ग्रामपंचायतीने तसा ठराव केला. आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे पाठवला. मात्र मंगरूळ गावापासून तापी नदी सुमारे २२ किमी अंतरावर आहे. तेथून पाईप लाईन करून आणणे व तापी नदीवर यंत्रणा उभारणे या कामासाठी पाच कोटी पेक्षा जास्त खर्च येणार आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला जलजीवन मिशन अंतर्गत खर्च मर्यादा फक्त पाच कोटी रुपये असल्याने जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश भोगावडे यांनी या योजनेचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी शासनाला पत्र पाठवले आहे. व संबंधित ग्रामसेवक, प्रशासक यांनी ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे संपर्क साधावा असेही पत्र दिले आहे. या पत्राच्या प्रती पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील, अधीक्षक अभियंता जीवन प्राधिकरण याना पाठवण्यात आल्या आहेत.




