अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ च्या नगरसेविका शोभाबाई भिवसन गढरे यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना नियमित आरोग्य तपासणी तसेच आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, आरोग्य विभागातील कर्मचारी गटार, नाले, सार्वजनिक शौचालये, धुराडी, कचरा तसेच इतर अस्वच्छ ठिकाणांची साफसफाई करत असल्याने त्यांना विविध संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच कर्मचाऱ्यांना रेनकोट, गमबूट, हातमोजे, मास्क आणि संपूर्ण सेफ्टी किट यांसारखे आवश्यक संरक्षण साहित्य तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे, जेणेकरून काम करताना त्यांच्या आरोग्याला कोणताही धोका निर्माण होणार नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.नगरसेविका शोभाबाई गाढरे यांच्या या मागणीची दखल घेत नगरपरिषद प्रशासनाने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



