
«”विकासाच्या वाटेवर चालणारा नेता तोच खरा ठरतो,
जनतेच्या सुख-दुःखात धावून येणारा नेता जनमानसात घर करतो.”»
«”पद मोठे नसते, मोठे असते कर्तृत्व;
जनतेच्या विश्वासावर उभे राहणारे नेतृत्वच घडवते इतिहास.”»
राजकारण ही केवळ सत्तेची स्पर्धा नसते, तर ती समाजकारणाची, विकासाची आणि लोकसेवेची अखंड साधना असते. जनतेच्या विश्वासाला सर्वोच्च स्थान देत, प्रत्येक निर्णयात सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करणारे नेतृत्व समाजात कायम स्मरणात राहते. अमळनेर तालुक्याच्या राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक इतिहासात असेच एक विश्वासार्ह, अभ्यासू, संयमी, विकासाभिमुख आणि लोकहितवादी नेतृत्व म्हणजे मा. आमदार दादासाहेब अनिल भाईदास पाटील.

त्यांनी आपल्या कार्याचा पाया सत्तेवर नव्हे, तर जनतेच्या विश्वासावर उभारला. संघर्ष, प्रामाणिकपणा, अभ्यासू वृत्ती, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांविषयी असलेली आत्मीयता, विकासासाठी असलेली तळमळ आणि प्रत्येक व्यक्तीच्या सुख-दुःखात धावून जाण्याची संवेदनशीलता या गुणांमुळे त्यांनी अमळनेरकरांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहिले, तर तो एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलापासून लोकनेता होण्यापर्यंतच्या अथक परिश्रमांचा, संघर्षाचा आणि जनसेवेच्या व्रताचा प्रेरणादायी प्रवास आहे.
सर्वसामान्य कुटुंबातील संस्कार…
मा. दादासाहेब अनिल भाईदास पाटील यांचा जन्म ७ जुलै १९६८ रोजी एका सुसंस्कृत आणि सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते. शिक्षणाचे महत्त्व जाणणारे वडील आणि संस्कारमय कौटुंबिक वातावरण यामुळे बालपणापासूनच दादांच्या व्यक्तिमत्त्वात शिस्त, प्रामाणिकपणा, अभ्यासू वृत्ती आणि समाजाविषयीची जाणीव विकसित झाली.
वडिलांनी नेहमीच शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्याचा परिणाम म्हणून दादांनी प्राथमिक शिक्षण जळगाव जिल्ह्यात पूर्ण करून पुढील उच्च शिक्षणासाठी पुणे गाठले.
उच्च शिक्षणाचा भक्कम पाया…
राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी ज्ञानसंपन्न होण्याचा मार्ग निवडला. पुणे येथे त्यांनी एम.कॉम., एमबीए आणि एलएलबी अशी उच्च पदवी प्राप्त केली. आर्थिक, कायदेशीर, प्रशासकीय आणि व्यवस्थापन विषयांचा सखोल अभ्यास केल्यामुळे त्यांच्या निर्णयक्षमतेत दूरदृष्टी आणि अभ्यासपूर्ण विचारसरणी निर्माण झाली.
आजही कोणत्याही विषयावर विधानसभेत अथवा प्रशासनासमोर मुद्देसूद भूमिका मांडताना त्यांच्या अभ्यासू स्वभावाची प्रचिती येते.
संसाराची जबाबदारी आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व…
दि. १७ मे १९९७ रोजी त्यांचा विवाह दोनगाव येथील सौ. जयश्री अनिल पाटील यांच्याशी झाला.
राजकारणातील व्यस्त जीवन असूनही त्यांनी कुटुंबाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. सामाजिक जबाबदारी आणि कौटुंबिक जबाबदारी यांचा सुंदर समतोल राखत त्यांनी आदर्श कौटुंबिक जीवन जगले. पुढे सौ. जयश्री पाटील यांनीही नगराध्यक्ष म्हणून शहर विकासात उल्लेखनीय योगदान देत त्यांच्या कार्याला सक्षम साथ दिली.
समाजकारणातून राजकारणाकडे…
उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेकांप्रमाणे नोकरीचा मार्ग न स्वीकारता दादांनी समाजसेवेचा मार्ग निवडला. सुशिक्षित तरुणांनी राजकारणात यावे, विकासाची दिशा ठरवावी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी झटावे, या विचारातून त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला.
त्यांच्या राजकीय वाटचालीची सुरुवात विकास सोसायटीपासून झाली. त्यानंतर त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रवेश करून सलग दहा वर्षे सभापती म्हणून काम केले.
शेतकऱ्यांच्या न्यायासाठी झटणारे नेतृत्व…
बाजार समितीचे सभापती असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. विशेषतः उघड कापूस लिलाव प्रणाली सुरू करून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य भाव मिळावा यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
त्या काळात बाजार समितीचा कारभार अधिक पारदर्शक, शेतकरी हिताचा आणि विकासाभिमुख करण्यासाठी त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यामुळे शेतकऱ्यांचा त्यांच्यावरचा विश्वास अधिक दृढ झाला.
«”शेतकऱ्याच्या घामाला जेव्हा योग्य दर मिळतो,
तेव्हाच विकासाचा खरा सूर्य उगवतो.”»
ही विचारधारा त्यांनी प्रत्यक्ष कामातून सिद्ध करून दाखवली.
संघर्षातून घडलेले नेतृत्व… जनविश्वासातून उभा राहिलेला विकासाचा दीपस्तंभ
«”वादळे कितीही आली तरी पर्वत डगमगत नाही,
जनतेचा विश्वास जिंकणारा नेता कधी पराभूत होत नाही.”»
कृषी उत्पन्न बाजार समितीतील यशस्वी कार्यकाळानंतर मा. दादासाहेब अनिल भाईदास पाटील यांनी आपले संपूर्ण लक्ष ग्रामीण विकासाकडे केंद्रित केले. केवळ पद भूषविणे हे त्यांचे ध्येय नव्हते; तर त्या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे, हीच त्यांची कार्यपद्धती होती.
जिल्हा परिषदेतून ग्रामीण विकासाची नवी दिशा…
सन २००० मध्ये दादांनी प्रथमच जळगाव जिल्हा परिषद निवडणूक लढविली आणि जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना विजयी केले. हा विजय केवळ एका उमेदवाराचा नव्हता, तर विकासाच्या विचारांचा विजय होता.
पहिल्याच कार्यकाळात त्यांनी ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांवर विशेष भर दिला. गावागावातील शेतरस्ते, बंधारे, लघुपूल, पिण्याच्या पाण्याच्या योजना, शाळांची दुरुस्ती, शैक्षणिक सुविधा, आरोग्य सेवा, शेती अवजारे, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार, सिंचन व्यवस्था यांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
त्यांच्या कार्याची दखल घेत जनतेने २००५ मध्ये पुन्हा एकदा त्यांना जिल्हा परिषदेत निवडून दिले. सलग दोन कार्यकाळात त्यांनी विकासकामांचा वेग कायम ठेवला.
ग्रामीण भागातील प्रत्येक गावात विकासाची गंगा पोहोचावी, शेतकऱ्यांचा खर्च कमी व्हावा, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा मिळाव्यात आणि गावांचा सर्वांगीण विकास व्हावा, या ध्येयाने त्यांनी काम केले.
सहकार क्षेत्रातील दमदार नेतृत्व…
शेतकरी हा सहकाराचा केंद्रबिंदू आहे, या विचारावर विश्वास ठेवून त्यांनी सहकार क्षेत्रातही मोठे योगदान दिले.
सन २०११, २०१६ आणि २०२१ या सलग तीन निवडणुकांमध्ये जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांनी विजय मिळविला.
संचालक म्हणून त्यांनी शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज, पीक कर्ज वेळेवर उपलब्ध व्हावे, सहकारी संस्थांना आर्थिक बळ मिळावे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
सहकार क्षेत्रातील त्यांचा अभ्यास, दूरदृष्टी आणि पारदर्शक कारभार यामुळे त्यांची ओळख एक सक्षम सहकार नेते म्हणून निर्माण झाली.
वैयक्तिक दुःखावर मात करत पुढे चालत राहिले…
सार्वजनिक जीवनात यश मिळत असतानाच नियतीने त्यांच्या आयुष्यात मोठी परीक्षा घेतली.
सन २००४ मध्ये त्यांचे लहान बंधू स्व. राजेश पाटील यांचे अपघाती निधन झाले. हे दुःख त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत असह्य होते.
परंतु संकटापुढे न झुकता त्यांनी आपल्या कुटुंबाला धीर दिला. स्वतःचे दुःख मनात ठेवून जनतेच्या सेवेत ते पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहिले.
«”ज्यांच्या आयुष्यात संघर्ष असतो,
त्यांच्याच यशाला इतिहास सलाम करतो.”»
हा प्रसंग त्यांच्या आयुष्यातील मोठा टप्पा ठरला. त्यानंतर त्यांनी आणखी जोमाने समाजकार्य सुरू ठेवले.
अमळनेर शहराच्या विकासात मोलाचे योगदान…
ग्रामीण भागाबरोबरच शहराचा विकासही तितकाच महत्त्वाचा असल्याचे लक्षात घेऊन त्यांनी सन २०११ मध्ये शहर विकास आघाडीची स्थापना केली.
या निवडणुकीत त्यांच्या पत्नी सौ. जयश्री अनिल पाटील नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या.
त्यांच्या कार्यकाळात अमळनेर शहरात अनेक ऐतिहासिक विकासकामे झाली.
शहरासाठी नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. घरकुल योजना पूर्ण करण्यात आली. शहरातील अनेक रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण, पथदिवे, आरोग्य सुविधा, स्वच्छता व्यवस्था, नागरी सुविधा यामध्ये मोठी सुधारणा झाली.
शहराच्या सौंदर्यात भर घालणारे आधुनिक फिश मार्केट उभारण्यात आले. विविध विकासकामांमुळे अमळनेर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळाली.
पराभवातूनच विजयाची वाट…
दादांनी २००९ आणि २०१४ मध्ये विधानसभा निवडणूक लढविली.
दोन्ही वेळा विजय थोडक्यात हुकला; परंतु त्यांनी कधीही जनतेपासून अंतर ठेवले नाही.
पराभवामुळे निराश न होता त्यांनी गावोगावी फिरून लोकांशी संवाद वाढविला. प्रत्येकाच्या अडचणी समजून घेतल्या. संकटाच्या काळात मदतीला धावून गेले.
याच काळात त्यांचा जनसंपर्क अधिक दृढ झाला आणि जनतेशी भावनिक नाते निर्माण झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश आणि नव्या पर्वाची सुरुवात…
सन २०१७ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. कार्यकर्त्यांना बळ दिले. गावागावांत पक्षाची ताकद वाढविली.
त्यांच्या शांत, संयमी, अभ्यासू आणि विकासाभिमुख नेतृत्वामुळे अमळनेर विधानसभा मतदारसंघात त्यांच्याविषयीचा विश्वास दिवसेंदिवस वाढत गेला.
२०१९ – जनतेने दिलेला ऐतिहासिक कौल…
सन २०१९ ची विधानसभा निवडणूक हा त्यांच्या राजकीय जीवनातील सुवर्णक्षण ठरला.
अमळनेरच्या जनतेने त्यांना भरघोस मतांनी विजयी करून विधानसभेत पाठविले.
हा विजय केवळ एका उमेदवाराचा नव्हता; तर गेली अनेक वर्षे सातत्याने केलेल्या समाजसेवेचा, विकासाच्या राजकारणाचा आणि जनतेशी जपलेल्या विश्वासाच्या नात्याचा होता.
याच काळात अमळनेरच्या जनतेने त्यांना प्रेमाने आणि अभिमानाने “भूमिपुत्र” ही सन्मानाची उपाधी बहाल केली.
कारण जनतेला त्यांच्यात सत्ता नव्हे, तर स्वतःच्या घरातील माणूस दिसत होता.
«”जनतेच्या विश्वासाचा जो मान राखतो,
इतिहास त्यालाच लोकनेता म्हणून ओळखतो.”
विकासाचा ध्यास… जनतेच्या विश्वासाला दिलेला न्याय…!
«”सत्ता ही साधन असते, साध्य नसते;
जनतेच्या कल्याणासाठी झटणारे नेतृत्वच खऱ्या अर्थाने लोकनेतृत्व ठरते.”»
सन २०१९ मध्ये अमळनेरच्या जनतेने प्रचंड विश्वासाने मा. दादासाहेब अनिल भाईदास पाटील यांना विधानसभेत पाठविले आणि त्यानंतर अमळनेर तालुक्याच्या विकासाला अभूतपूर्व गती मिळाली. जनतेने दिलेल्या विश्वासाचे ओझे नव्हे, तर उत्तरदायित्व मानून त्यांनी प्रत्येक गाव, प्रत्येक वाडी-वस्ती आणि प्रत्येक नागरिकाच्या विकासासाठी स्वतःला झोकून दिले.
विधानसभेतील अभ्यासू आणि प्रभावी नेतृत्व
आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांच्या अभ्यासू वृत्तीची दखल घेत त्यांना महाराष्ट्र विधानसभेच्या तालिका अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर प्रमुख प्रतोद ही महत्त्वाची जबाबदारीही सोपविली.
विधानसभेत त्यांनी केवळ अमळनेरच नव्हे, तर शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला, युवक, दिव्यांग आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण मांडणी केली. त्यांच्या शांत, संयमी आणि मुद्देसूद भाषणांमुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली.
विकासकामांचा अभूतपूर्व वेग
आमदार झाल्यानंतर त्यांनी अमळनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार केला आणि शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून अनेक महत्त्वाकांक्षी कामांना गती दिली.
त्यांच्या पाठपुराव्यामुळे महसूल विभागाच्या नवीन इमारतीसाठी १४.१७ कोटी रुपयांचा निधी, तर प्रशासकीय इमारतीसाठी ११.६० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला.
२५/१५ योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या निधीतून सभागृहे, ग्रामपंचायत कार्यालये, सिमेंट काँक्रीटीकरण, चौक सुशोभीकरण, व्यायामशाळा, सामाजिक सभागृहे आणि विविध मूलभूत सुविधा उभारण्यात आल्या.
ग्रामीण भागात शेकडो किलोमीटर रस्ते, लघुपूल, बंधारे, संरक्षण भिंती आणि सिंचनास पूरक विकासकामे करण्यात आली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे त्यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्णत्वास गेली.
कोविड काळातील लोकसेवेचा आदर्श
संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाशी झुंज देत असताना दादांनी केवळ लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर कुटुंबप्रमुखाप्रमाणे अमळनेर तालुक्याची जबाबदारी स्वीकारली.
कोविड सेंटर सुरू करून रुग्णांना उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली. औषधे, ऑक्सिजन, बेड, अन्नधान्य आणि आवश्यक मदतीसाठी त्यांनी प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधला.
अनेक गरजू कुटुंबांना आर्थिक आणि वैद्यकीय मदत करून त्यांनी संकटकाळात जनतेचा विश्वास अधिक दृढ केला.
शेतकरी हितासाठी सातत्यपूर्ण संघर्ष
दादांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू नेहमीच शेतकरी राहिला आहे.
पीक विमा, अतिवृष्टी नुकसानभरपाई, सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान, कांदा, कापूस, केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांनी शासनाचे लक्ष वेधले.
विरोधी पक्षात असतानाही त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली. विधानसभेत आणि रस्त्यावरही शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी त्यांनी सातत्याने आवाज उठविला.
युवक, महिला आणि दिव्यांगांसाठी संवेदनशील नेतृत्व
तरुण पिढी सक्षम झाली तर समाज सक्षम होईल, या विचारातून त्यांनी युवकांसाठी क्रीडासंकुलांचे आधुनिकीकरण, अभ्यासिका, व्यायामशाळा, ग्रंथालये आणि क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी निधी मिळवून दिला.
दिव्यांग बांधवांसाठी विशेष शिबिरे आयोजित करून विविध योजनांचा लाभ मिळवून दिला.
महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न, स्वयंसहाय्यता गट, नागरी सुविधा आणि सामाजिक प्रश्नांबाबतही त्यांनी सातत्याने शासनाशी पाठपुरावा केला.
धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी प्रयत्न
अमळनेरचे मंगलग्रह मंदिर तसेच बहादरपूर येथील श्री बद्रीनारायण मंदिरासाठी तीर्थक्षेत्र व पर्यटन विभागामार्फत निधी मंजूर करून धार्मिक पर्यटनाला चालना दिली.
धार्मिक स्थळांचा विकास म्हणजे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ, रोजगारनिर्मिती आणि सांस्कृतिक परंपरेचे संवर्धन, हा त्यांचा दृष्टिकोन प्रत्येक निर्णयातून दिसून आला.
वीज, पाणी आणि पायाभूत सुविधांवर भर
सारबेटे, मारवड आणि शेळावे येथे नवीन वीज उपकेंद्रांना मंजुरी मिळवून ग्रामीण भागातील वीजपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
शहरात भव्य प्रवेशद्वारे, हरित पट्टे, उद्याने, संरक्षण भिंती, शाळांच्या कंपाउंड भिंती आणि इतर अनेक विकासकामांमुळे अमळनेरच्या विकासाला नवी ओळख मिळाली.
पाडळसरे धरण – भूमिपुत्राने पूर्ण केलेले स्वप्न
अमळनेर तालुक्याच्या इतिहासात जर एखाद्या विकासकामाचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल, तर ते म्हणजे पाडळसरे धरण प्रकल्प.
अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न सोडविण्यासाठी दादांनी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा केला.
त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे पाडळसरे धरणासाठी ४ हजार ८९० कोटींची सुधारित सुप्रमा मिळवून दिली व या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळाली.
या प्रकल्पामुळे भविष्यात अमळनेर तालुक्यातील शेती, पिण्याचे पाणी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळणार आहे.
याच कामामुळे जनतेने त्यांना दिलेली “भूमिपुत्र” ही उपाधी अधिक सार्थ ठरली.
«”जो आपल्या मातीतल्या माणसांसाठी झटतो,
तोच इतिहासात भूमिपुत्र म्हणून अजरामर होतो.”
जनतेच्या विश्वासापासून मंत्रिपदापर्यंत… विकास, विश्वास आणि समर्पणाचा अविरत प्रवास
«”कर्तृत्वाला पदाची गरज नसते,
पण कर्तृत्ववानाच्या हाती पद आले की विकासाला नवी गती मिळते.”»
मा. आमदार दादासाहेब अनिल भाईदास पाटील यांचा राजकीय प्रवास हा केवळ निवडणुका जिंकण्याचा प्रवास नाही, तर जनतेचा विश्वास जिंकत जबाबदाऱ्या समर्थपणे पेलण्याचा प्रवास आहे. प्रत्येक पदाला न्याय देत त्यांनी लोकहितालाच सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यामुळेच आज त्यांचे नाव विकासाभिमुख, अभ्यासू आणि जनसामान्यांशी नाळ जोडलेल्या नेतृत्वात आदराने घेतले जाते.
पक्ष संघटनेतील विश्वासार्ह नेतृत्व
लोकप्रतिनिधी म्हणून विकासकामांबरोबरच त्यांनी पक्षसंघटनाही अधिक मजबूत करण्याचे कार्य केले. गावपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत अनेक ग्रामपंचायती, विकास सोसायट्या, सहकारी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाचे कार्यकर्ते निवडून येण्यासाठी त्यांनी सातत्याने मार्गदर्शन केले.
त्यांच्या संघटनकौशल्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांच्या प्रभारीपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविली. ही जबाबदारी त्यांनी कार्यकर्त्यांना बळ देत, पक्षविस्तार आणि जनसंपर्क अधिक दृढ करत यशस्वीपणे पार पाडली.
मंत्रीपदाची जबाबदारी आणि लोकसेवेची नवी दिशा
जुलै २०२३ मध्ये राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांची मदत व पुनर्वसन मंत्री (कॅबिनेट) म्हणून नियुक्ती झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली.
मंत्री म्हणून त्यांनी आपत्तीग्रस्त, पूरग्रस्त, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी व नागरिकांना वेळेत मदत मिळावी, पुनर्वसनाची प्रक्रिया अधिक परिणामकारक व्हावी आणि शासनाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
प्रशासनातील अभ्यास, निर्णयक्षमता आणि संवेदनशील दृष्टिकोन यांच्या जोरावर त्यांनी मंत्रीपदालाही न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
अमळनेरचा विकास – अखंड सुरू असलेली वाटचाल
आमदार आणि मंत्री या दुहेरी जबाबदारीतूनही अमळनेर मतदारसंघाकडे त्यांचे विशेष लक्ष कायम राहिले.
तालुक्यातील रस्ते, पूल, सिंचन प्रकल्प, शैक्षणिक सुविधा, धार्मिक स्थळांचा विकास, युवकांसाठी क्रीडा सुविधा, दिव्यांगांसाठी योजनांचा विस्तार, महिला सक्षमीकरण, शेतकरी हिताचे प्रश्न आणि पायाभूत सुविधा या सर्व क्षेत्रांत त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
आज अमळनेरच्या विकासाचा उल्लेख झाला की दादांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची नोंद आवर्जून घेतली जाते.
श्रद्धास्थानांच्या पुनरुत्थानासाठी संवेदनशील भूमिका
अमळनेरचे आराध्य दैवत असलेल्या श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थान येथे घडलेल्या भीषण आग दुर्घटनेनंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत नुकसानाची पाहणी केली.
संस्थानाची पुनर्बांधणी, धार्मिक वारशाचे जतन आणि भाविकांच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी राज्य शासनाकडे विशेष बाब म्हणून १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. हा विषय त्यांनी शासनस्तरावर सातत्याने मांडत संस्थानच्या पुनरुत्थानासाठी पुढाकार घेतला.
यातून धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा जपण्याबाबतची त्यांची संवेदनशील भूमिका पुन्हा अधोरेखित झाली.
जनतेच्या मनातील “भूमिपुत्र”
आज अमळनेर तालुक्यातील नागरिक त्यांना केवळ आमदार किंवा माजी मंत्री म्हणून पाहत नाहीत, तर संकटात धावून येणारा, प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणारा, विकासासाठी झटणारा आणि जनतेच्या प्रश्नांना स्वतःचे प्रश्न मानणारा “भूमिपुत्र” म्हणून ओळखतात.
साधेपणा, संयम, अभ्यास, प्रामाणिकपणा आणि लोकांशी जपलेले आत्मीय नाते हीच त्यांच्या लोकप्रियतेची खरी ताकद आहे.
«”नेतृत्व तेच, जे जनतेच्या डोळ्यात विश्वास निर्माण करते;
विकास तोच, जो प्रत्येकाच्या आयुष्यात बदल घडवतो.”»
वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा
आज मा. आमदार दादासाहेब अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आजवरच्या जनसेवेच्या, विकासाच्या आणि समाजकारणाच्या कार्याला मनःपूर्वक सलाम.
त्यांना उत्तम आरोग्य, निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या हातून अमळनेर तालुका, जळगाव जिल्हा आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी अशीच लोकोपयोगी कार्ये घडत राहोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
«”जनतेचा विश्वास लाभो अखंड,
विकासाचा दीप राहो प्रखर प्रचंड.
सेवाभावी कार्यास लाभो नवी उमेद,
वाढदिवसानिमित्त दादांना लाख लाख शुभेच्छांचा वेध..!”»
«”जनसेवा हीच ईश्वरसेवा, हा ध्यास अखंड राहो;
अमळनेरच्या विकासाचा सुवर्णइतिहास तुमच्या नेतृत्वाखाली अधिकाधिक उजळत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”
शब्दांकन-
गणेश धर्मराज भामरे-पाटील व्हॉईस प्रेसिडेंट- अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघ लि.
चेअरमन- बाम्हणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड



