अन्यथा तरुणांचा संविधान दिनापासून उपोषणाचा इशारा…
अमळनेर:- तालुक्यातील शिरूड येथील व्यायामासाठी राखीव असलेल्या क्रीडांगणावरील अतिक्रमण काढण्यासाठी युवकांनी दि.२६ संविधान दिनापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला असून याबाबत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत मालकीच्या गट क्र.५ मधील काही जागा ग्रामपंचायतने क्रीडांगणासाठी राखीव ठेवली असून तसा ठराव करण्यात आला आहे. मात्र त्या राखीव जागेवर गावातील नागरिकांनी रहिवास व गुरे बांधण्यासाठी शेड तयार करून घेतले असल्याने युवकांना व्यायाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होत असल्याने युवकांना रस्त्यावर अंधारात व्यायाम करावा लागतो. मात्र सुसाट जाणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावर व्यायाम करणाऱ्या युवकांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे क्रीडांगणावरील अतिक्रमण काढून क्रीडांगण युवकांसाठी मोकळे करून देण्याची मागणी गावातील युवकांनी केली आहे.जर अतिक्रमण काढले नाही तर दि. २६ नोव्हेंबर संविधान दिनापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.