अमळनेर : शाळा ,क्लासेस सुटल्यानंतर मुलींची छेड काढणाऱ्या १२ टारगट मुलांवर पोलिसांनी कारवाई केल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. तर टारगट मवाली मुलांमध्ये घबराहट पसरली आहे.
शाळा महाविद्यालय सुरू झाल्यानंतर काही टारगट मुले डी आर कन्याशाळा तसेच शिकवणी वर्ग सुटल्यावर घोळका करून उभे राहून मुलींची टिंगल टवाळी करणे , नाव घेणे , अश्लील इशारे करणे आदी गैरप्रकार करत होते. काल एकाने कन्याशाळेजवळ एका मुलीचा हात धरण्याचे धाडस केल्याने शहरात खळबळ माजली होती. घटनेचे वृत्त पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या कानावर जाताच त्यांनी ‛मिशन टारगट’ सुरू केले. पोलीस निरीक्षक देवरे यांनी स्वतः सह हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील , संदेश पाटील ,गणेश पाटील , अमोल पाटील ,सिद्धांत शिसोदे , मिलिंद बोरसे ,जितेंद्र निकुंभे , मंगल भोई , हितेश चिंचोरे , प्रमोद पाटील , मिलिंद सोनार , विनोद संदानशिव , निलेश मोरे , महिला कॉन्स्टेबल नम्रता जरे साध्या वेशात डी आर कन्याशाळेजवळ सापळा रचून गप्पा मारत उभे राहिले. साध्या वेशात पोलीस असल्याने टारगट मुलांना ते ओळखले गेले नाहीत. नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावर मुलांनी आपला वात्रट पणा सुरू केल्यावर पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. कारवाईचा पहिलाच दिवस असल्याने त्या टारगट मुलांना पोलिसी खाक्या दाखवून सक्त ताकीद देऊन सोडण्यात आले. दोन तीन दिवसांपूर्वी रस्त्यावरील हातगाड्या , बेशिस्त पार्किंग , मोटारसायकली ,प्रवासी वाहने यांच्यावर देखील पोलिसांनी कारवाई करून मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला होता.
उद्यापासून सर्व क्लासेस ,शाळा यांच्यावर पोलिसांची करडी नजर असेल. मुलींची छेड काढणाऱ्यांवर तसेच बेशिस्त वर्तणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. पालकांनी देखील आपल्या मुला मुलींच्या बाबतीत सतर्क रहावे.- विकास देवरे ,पोलीस निरीक्षक ,अमळनेर