
अमळनेर:- तालुक्यातील बोहरा शिवारात शेतात राहणाऱ्या आदिवासी पावरा कुटुंबातील अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फुस लावून नेल्याची फिर्याद मारवड पोलीसात देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बोहरा शिवारात माळण नदीकाठी उदरनिर्वाहासाठी शेतात आदिवासी पावरा समाजाचे कुटुंब झोपडी बांधून राहत असून त्यांच्या कुटुंबातील १५ वर्षीय मुलगी दिनांक १ रोजी तिच्या आईसोबत बकऱ्या चारण्यास गेली होती. दुपारी १२ वाजता डोके दुखत असल्याचे सांगून ती घराकडे निघाली. मात्र सायंकाळी तिचे वडील घरी आले असता ती मिळून आली नाही. आजूबाजूच्या परिसरात व नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला असता ती मिळून न आल्याने कोणीतरी अज्ञात इसमाने तिला फुस लावून पळवून नेल्याची खात्री तिच्या कुटुंबीयांना झाल्याने तिच्या वडिलांनी मारवड पोलिसांत फिर्याद दिली असून पुढील तपास पीएसआय विनोद पाटील हे करीत आहेत.




