
अमळनेर:- तालुक्यातील मुडी प्र डांगरी येथे पाळीव डुकरांनी शेतकरी त्रस्त झाले आहेत. उभ्या मका, हरभरा, ऊस या बागायती पिकांचे अतोनात नुकसान होत असून गावालगत शेती असलेल्या शेतकऱ्यांनी डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.
तालुक्यातील मुडी प्र डांगरी येथे गावालगत मोठ्या प्रमाणावर शेती आहे. डूकरांचा कळप रात्री जाऊन शेतकऱ्यांच्या उभ्या शेतात शिरून पिकांचे नुकसान होत आहे. काही शेतकऱ्यांची उभी पिके खाऊन तब्बल अर्धा एकरपर्यंत नुकसान केले आहे. याबाबत ग्रामसभेत तक्रार केली असता संबंधित डुक्कर मालकांना ग्रामपंचायतीने बंदोबस्त करण्याची सूचना केली होती. मात्र ग्रामसभा उलटून देखील १५ दिवस झाले मात्र डुक्कर मालकांनी सदर मोठ्या डुकरांचा बंदोबस्त केलेला नाही. वारंवार शेतकरी मालकांना सांगून देखील मालक एकमेकांकडे बोटे दाखवत आहेत. खरीप हंगामात पुरेशा पावसाअभावी उत्पन्नात मोठी घट झाल्याने शेतकरी वर्गाने रब्बी पिकांची लागवड केली आहे. मात्र या पाळीव डुकरांच्या उपद्रवाने शेतकरी त्रस्त झाला आहे. याकडे ग्रामपंचायतीने त्वरित लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यात योगेश हंसराज पाटील, बारकू पुंडलिक पाटील, डिगंबर साहेबराव बोरसे, हिंमत वना चौधरी, जयवंत हिंमतराव पाटील, डिगंबर दशरथ चौधरी आदी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.




