२०१८ पासून प्रलंबित रक्कम मिळवून दिल्याने मुख्याधिकारी सरोदे यांचा केला सत्कार…
अमळनेर:- नगरपरिषदेच्या ८९ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना २०१८ पासून प्रलंबित सव्वा कोटीचे वेतन रक्कम मिळवून दिल्याने मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचा सत्कार करण्यात आला.
सन २०१८ पासून सेवानिवृत्त सफाई कामगार व कार्यालयीन कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात सेवा उपदानाच्या रकमा प्रलंबित होत्या. त्या बाबत सेवानिवृत्त कर्मचारी तथा कामगार संघटनाच्या सारख्या तक्रारी सतत सुरु असायच्या. मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना देखील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे हाल बघवत नव्हते. त्यामुळे साहेबांनी सुमारे ५ वर्षांपासूनची उपदानाची सव्वा कोटी रुपयाची प्रलंबित रक्कम ८९ सफाई कामगार व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना वाटप केली. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची खऱ्या अर्थाने संक्रात गोड करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुखद दिलासा दिल्याबद्दल अमळनेर नगरपरिषदेतील कर्मचारी संघटनेचे अनिल बेंडवाल, किशोर संगेले, सोमचंद संदानशिव, प्रसाद शर्मा, अविनाश संदानशिव, ऍड. शकील काझी यांनी सरोदे यांचे विशेष आभार मानून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक रकमी सव्वाकोटीचे वाटप केल्याबद्दल अभिनंदन केले. या कामी मुख्याधिकारी यांना लेखापाल चेतन गडकर, लिपिक जगदीश ठाकरे, कमलेश पाटील यांचे सहकार्य लाभले.