
१७० गझलकार १७ मुशायऱ्यातून सादर करणार आपली गझल…
अमळनेर:- साहित्याच्या विचार संघर्षातून अखिल भारतीय पहिले मराठी एल्गार गझल संमेलनाचा तिसरा अंकुर फुटला. २७ व २८ जानेवारीला देशभरातील गझलकार अमळनेरात हजेरी लावणार आहेत. मराठी शायरी आणि मुशायऱ्याचे शब्दसंवाद आणि वाहवाहचे प्रतिसाद छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात निनादणार आहेत.

पहिल्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलन होत असलेल्या अमळनेर नगरीला पूज्य सानेगुरुजी साहित्य नगरी नाव देण्यात आले असून मुख्य मंचाला गझल सम्राट सुरेश भट मंच नाव देण्यात आले आहे. देशभरातील १७० गझलकार १७ मुशायऱ्यातून आपल्या गझल सादर करणार आहेत. या मुशायर्यांना दिवंगत गझलकार स्व.कमलाकर (आबा) देसले, म. बदीउज्जमा ‘खावर’ , स्व. मनोहर रणपिसे ,स्व. अरुणोदय भाटकर ,म. इलाही जमादार ,स्व. अनिल कांबळे ,स्व. मधुसूदन नानिवडेकर ,स्व. प्रकाश मोरे ,स्व. व्यंकट देशमुख ,स्व. विनिता कुलकर्णी पाटील ,स्व. नाना बेरगुडे ,स्व. सुप्रिया जाधव ,स्व. उ. रा. गिरी ,स्व. लक्ष्मण जेवणे ,स्व. रवींद्र ठाकूर ,स्व. गिरीश खारकर ,म.कलीम खान ,स्व. गौरवकुमार आठवले यांची नावे देऊन त्यांना गझल आदरांजली वाहण्यात येणार आहे.
गझल संमेलनाचे उदघाटन जेष्ठ रंगकर्मी आणि साहित्य अभ्यासक शम्भू(आण्णा) पाटील यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षपद शिवाजी जवरे (बुलढाणा) हे भूषवणार आहेत. तर स्वागताध्यक्ष मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील असतील. प्रमुख अतिथी म्हणून दगडु लोमटे(अंबाजोगाई), नाना लोढम (अमरावती), शरद पाटील (संचालक केमिनोव्हा ऍग्रोटेक शहादा) हे हजर राहणार आहेत.
हे जगण्याचे भाषांतर …(काळजाचा काळजाशी थेट संवाद) हा गझल गायन कार्यक्रमात राहुलदेव कदम (लातूर), संकेत नागपूरकर (नागपूर) हे गझल गायन करणार आहेत. गोपाळ मापारी (बुलढाणा ) निवेदन करणार आहेत तर योगेश संदानशीव तबला , जितेश मराठे (जळगाव) हार्मोनियम ,स्वराज्य भोसले (पुणे) गिटार , आइनोद्दीन वारसी (देगलूर) बासरी ची साथ देणार आहेत. “मराठी गझल : आजची व उद्याची आव्हाने” या विषयावर परिसंवाद होणार असून यात अध्यक्ष प्रमोद खराडे (पुणे) ,संजय गोरडे (नाशिक), शांताराम खामकर (अहमदनगर), अनंत नांदूरकर (खलिश) नागपूर हे वक्ते सहभागी होणार आहेत.
गझल संमेलनात सविता महेश सामंत (गोवा), अरुण सावंत (नवी दिल्ली), नितीन वायाळ ,भरुच (गुजरात ), प्रथेश तुगावकर (हैद्राबाद ), ललित बोरकर( सुरत ) , सतीश दराडे (बीड), नितीन देशमुख (अमरावती), शिव डोईजोडे (उदगीर), दत्तप्रसाद जोग (गोवा) आदी गझलकार उपस्थित राहणार आहेत.




