
दुसरे अखिल भारतीय मराठी गझल संमेलन अंबेजोगाई येथे होणार…
अमळनेर:- गझल हे समाजजीवनावर, संस्कृतीवर आणि वास्तववादी जीवनावर प्रकाश टाकण्याचे साधन आहे. आपल्या भाषेची ,आपल्या समस्यांची गझल येत आहे. हे आपले भाग्य आहे अखिल भारतीय संमेलन भरणे म्हणजे गझल व्यापक झाली, गझलेची उत्तम काळ आहे असे प्रतिपादन पहिले अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाचे अध्यक्ष शिवाजीराव जवरे यांनी समारोप प्रसंगी केले. दुसरे अखिल भारतीय मराठी गझल संमेलन अंबेजोगाई येथे घेण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. यावेळी सात ठराव मंजूर करण्यात आले.
२७ व २८ जानेवारी रोजी पूज्य सानेगुरुजी साहित्य नगरी अमळनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात खान्देश साहित्य संघातर्फे गझल संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी दगडू लोमटे म्हणाले की, खान्देश साहित्य संघाने अखिल भारतीय गझल संमेलनाची मशाल पेटवली आहे ही मशाल अशीच पेटती पाहिजे. गझलेला स्वतंत्र अस्तित्व पाहिजे होते म्हणून हे संमेलन भरवण्यात आले. साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रा डॉ सदाशिव सूर्यवंशी म्हणाले की, सानेगुरुजींच्या भूमीत विवादातून अथवा वादातून नव्हे तर संवादातून गझल संमेलन झाले. अखिल भारतीय मराठी संमेलनाला पर्याय म्हणून आमची भूमिका नव्हती. यावेळी विविध ठराव मांडण्यात आले. गझल व बोलीभाषा साहित्याचा प्राथमिक स्तरापासून ते उच्च शिक्षणपर्यँयत अभ्यासक्रमात समावेश करावा , अहिराणी भाषेला प्रमाण भाषेचा दर्जा मिळावा आणि संविधानातील आठव्या सूचित समावेश करावा, खान्देशातील कृषिव जलसिंचन व इतर क्षेत्रातील अनुशेष भरून काढण्यासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळ निर्माण करून विविध प्रकल्प निर्मिले जावेत, गझल कार्यशाळा, संवर्धनसाठी, संमेलन साठी साहित्य मंडळाने व भाषा मंत्रालयाने आर्थिक तरतूद करावी, खान्देशी बोली भाषा साहित्य व संस्कृती संवर्धन तथा वृद्धीसाठी स्वतंत्र संशोधन केंद्र व संग्रहालय खान्देशात उभारावे, खान्देशातील पाडळसरे धरणाचा केंद्राच्या योजनेत समावेश करावा आणि गतीने प्रकल्प पूर्ण करावा, अखिल भारतीय गझल संमेलन व गझल संवर्धन, समृद्धीसाठी शासन दरबारी भूमिका मांडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अभिनंदनाचा असे ठराव मांडण्यात आले व एकमताने मंजूर करण्यात आले. शिवाजी जवरे, नितीन देशमुख , शिव डोईजोडे, दगडू लोमटे, शरद धनगर, डॉ सदाशिव सुर्यवंशी, डॉ कुणाल पवार, महेंद्र बोरसे, रमेश बोरसे, रत्ना पाटील,सुनीता पाटील, संजय पाटील आदींनी हे ठराव मांडले.
दोन दिवसांच्या या गझल संमेलनात गझलकारांनी शेती व्यवस्था, समस्या, सरकारचे धोरण, प्रेम,कुटुंब,शिक्षण, महागाई, राजकीय स्थिती यावर मोजक्या शब्दात प्रकाश टाकला.




