
अमळनेर:- कविवर्य पुरूषोत्तम नारखेडे (मालतीकांत) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १७वे बहिणाबाई सोपानदेव खान्देश राज्य मराठी साहित्य संमेलनातर्फे शांतीनिकेतन शाळेतील शिक्षक, कवी व पत्रकार अजय भामरे लिखित “क्रांतीलहर” या काव्यसंग्रहाला वाड्:मय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सदर पुरस्कार सोहळा रविवारी दि.११ फेब्रुवारी रोजी सरदार वल्लभभाई पटेल ,लेवा भवन हाॅल ,जळगाव येथे पार पडला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर, संमेलनाचे स्वागत अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक संजय सोनवणे, साहित्यिक वा.ना. आंधळे, माया दुप्पळ व मंचावर उपस्थित मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, गुलाब पुष्प देऊन त्यांना गौरविण्यात आले. अजय भामरे हे समता शिक्षक परिषदेचे पदाधिकारी असून उत्स्फूर्त कविता करणारे कवी आहेत. आपल्या कवितेत त्यांनी पुरोगामी विचारांची मांडणी केली असून ते संवेदनशील, वास्तववादी कवी आहेत. १८व्या विद्रोही साहित्य संमेलनात त्यांच्या तीन कवितांचे प्रभावीपणे सादरीकरण झालेले आहे. यावेळी सोपान भवरे, सर्जेराव शिसोदे, बापूराव पाटील (ठाकरे), मिलिंद निकम आदी उपस्थित होते. त्यांच्या या सन्मानाबद्दल त्यांच्यावर शैक्षणिक, सामाजिक तसेच हिंतचिंतक व मित्रपरिवाराकडून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





