
बेटावद जवळील घटना, रेल्वे अधिकाऱ्यांच्या सतर्कतेने टळला मोठा अनर्थ….
अमळनेर:- अहमदाबादहुन हावडा जाणाऱ्या रेल्वे क्रमांक १२८३३च्या चाकांमध्ये दोष निर्माण झाल्याने आग लागून धूर निघाल्याची घटना बेटावद जवळील पांझरा नदीच्या पुलावर ४ रोजी सकाळी ९ वाजता घडली. रेल्वे अधिकाऱ्यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला.
अहमदाबाद हावडा एक्स्प्रेस सकाळी ९ वाजेच्या सुमारास बेटावद स्टेशनजवळून सुटल्यावर पांझरा पुलावर बी ८ बोगीच्या चाकातून अचानक धूर निघून वास येऊ लागला आणि गाडीचा डब्बा गरम वाटू लागल्याने गाडीतच बसलेले स्टेशन अधीक्षक (वाणिज्य) प्रमोद ठाकूर यांनी तातडीने टी टी ई धीरजकुमार यांच्या मदतीने रेल्वे थांबवली. प्रवाशी घाबरून खाली उतरून पळू लागले होते. ठाकूर धीरजकुमार, गँगमन देवेंद्र बासू आणि काम करणारे गँगमन यांनी रेल्वेतीलच १२ ते १६ अग्निशमन सिलेंडर काढून आग नियंत्रित केली. त्यांनतर संपूर्ण गाडी तपासण्यात आली. या कार्याला सुमारे एक तास ४० मिनिटे लागली. व भुसावळपर्यंत रेल्वेचा वेग ताशी ७० किमी पर्यंत ठेवून नेण्याच्या सूचना लोकोपायलटला देण्यात आल्या. वेळीच ही बाब निदर्शनास आल्याने आग आटोक्यात आली. अन्यथा रेल्वेच्या वेगात हवेने आग भडकून अनर्थ घडला असता.




