
1996-98 शैक्षणिक वर्षातील मित्रमैत्रिणींची तब्बल 26 वर्षांनी भेट…
अमळनेर:- “कधी विणेतून आलो कधी टाळातून आलो, तुकोबांची व्यथा घेऊन मी तळागाळातून आलो”, ही भावना मनात घेऊन जळगाव शहरातील रिगल पॅलेस हॉटेल मध्ये खिरोदा येथील डी एड कॉलेज च्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवारी संपन्न झाला.
शैक्षणिक वर्ष 1996/98 च्या बॅचचे सर्व विद्यार्थी तब्बल 26 वर्षांनी एकमेकांना भेटल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कार्यक्रमाच्या सुरुवात प्रार्थनेने झाली. नंतर प्रत्येकाने आपला परिचय करून देत 26 वर्षात आयुष्यात आलेल्या स्थित्यंतराची माहिती दिली,एकमेकांचे सुखदुःखाचे प्रसंग ऐकत असताना उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले, कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा देत सर्वांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला. पुन्हा एकदा विद्यार्थी दशेत घेऊन जाण्यासाठी फुगा आणि टाचणी हा गंमतीदार खेळ खेळवण्यात आला, प्रत्येक जण आपला फुगा वाचवण्यासाठी धडपड असताना इतरांचा फुगा फोडण्यासाठी मात्र पळापळ करत होता, यातून योग्य तो संदेश देण्यात आला.काहींनी करोके म्युझिक सिस्टिमवर नवे जुने गीत सादर केले, यावेळी कॉलेजमधील प्रेमींयुगुल मात्र नंतर आयुष्यात खरे जोडीदार झालेल्या जोडप्यांनी सुंदर नृत्य सादर केले, दिवंगत मित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली, सकाळीं 10 ते सायंकाळी 5 पर्यंत रिगल हॉटेलमधील सभागृहात डी एड कॉलेजमय वातावरणाची पुनर्निर्मितीच झाली होती.
विठोबा संपली वारी निघू का रे घरी आता…
यापुढे दरवर्षी स्नेहमेळावा घेऊया म्हणत मित्रमैत्रिणीनी आपला निरोप घेतला. स्नेहमेळाव्याचे नियोजन अधिव्याख्याता शैलेश पाटील आणि मित्रांनी केले होते. यावेळी तहसीलदार मुकेश हिवाळे, अधिव्याख्याता शैलेश पाटील, प्रसन्ना बोरोले,मनोज लुल्ले,,महेंद्र रामोशे,सुनील माळी,सारिका पाटील,सारिका रंधे, वैशाली वारखे, मीनल ठाकूर,सविता शिंदे,श्याम ठाकरे, वर्षा ठाकरे, विजय झोपे,दीपक सोनार,गणेश सनान्से,चारुलता वारके,ज्योती पवार, प्रतिभा वानखेडे, सुरेखा मुंडके,नवनिता तळेले,ज्योती चौधरी, धीरज चौधरी, चरण पाटील, शारदा मशाने,आशा कोळी, राजेंद्र बरहाटे,अजय कानडे,भारती आवचारे,अनिता जाधव, शुभांगी पाटील यासह शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा शैलेश पाटील यांनी केले तर आभार अनिल चौधरी यांनी मानले.




