
महिला हाउसिंग ट्रस्टने पर्यावरणसह जलसंरक्षणाचा दिला संदेश…
अमळनेर:- जागतिक महिला दिनानिमित्त येथील महिला हाऊसिंग ट्रस्टतर्फ़े विविध प्रबोधनात्मक विषयावर रांगोळी स्पर्धा उत्साहात पार पडली.
जलवायू परिवर्तन,जल संरक्षण, पर्यावरण संरक्षण, लिंग भेद, शहरीकरण आणि शहरी नियोजन व नेतृत्व या सहा विषयांवर ही स्पर्धा घेण्यात आली. सर्वानी रांगोळीतुन विविध संदेश दिले.यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रतिक जैन,निवृत्त प्रशासन अधिकारी संजय चौधरी व महिला मंचच्या भारती गाला यांनी उपस्थिती दर्शविली.ताडेपुरा भागातील नीता पाटील यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग या विषयावर रांगोळी काढून आमच्या भागात याच प्रमाणे काम झाल्याने त्या विषयावर रांगोळी काढल्याचे सांगितले. गांधलीपुऱ्यातील नंदिनी विनोद पारधी यांनी रांगोळीच्या माध्यमातून पर्यावरण वाचविण्याचा संदेश दिला. गलवाडे येथील अर्चना कुंभार यांनी त्यांच्या रांगोळीतुन पर्यावरणाचा ह्रास झाला तरी पुढील पिढीही आत्महत्या करण्यास प्रवृत्त होईल असा संदेश दिला. बंगाली फाईल येथील भाग्यश्री साळुंखे यांनी स्त्री कशी शिकली व कशी प्रगती झाली हे रांगोळीतून साकारले. सर्वानी या रांगोळ्यांचे कौतुक केले. महिलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी महिला हाऊसिंग ट्रस्टतर्फ़े बक्षीस देण्यात आले.




