
आपल्या पतीला स्वत:ची किडनी देवून वाचवले पतीचे प्राण…
अमळनेर:- एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो असे म्हटले जाते. शहरातील लक्ष्मी नगरचे रहिवासी गिरीश पाटील यांच्या धर्मपत्नी नुतन पाटील यांनी आपल्या पतीला स्वत:ची किडनी देऊन पतीचे प्राण वाचविले. मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये ही यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली.

या शस्त्रक्रियेमुळे शहरातील लक्ष्मी नगरचे रहिवासी तथा धुळे ग. स. बँक शाखा अमळनेरचे शाखाधिकारी गिरीश शांताराम पाटील (वय- ४९) यांना जीवनदान मिळाले. गिरीश पाटील यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने ते सहा महिन्यांपासून अंथरुणाला खिळले होते.त्यांंना मुंबई येथे जसलोक रूग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील वैद्यकीय अधीक्षक पदावर असलेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम एम बहाद्दर व डॉक्टर रैना यांनी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेबाबत कुटुंबीयांचे समुपदेशन केले. विविध चाचण्याअंती गिरीश भाऊ पाटील यांच्या पत्नी नुतन पाटील यांनी किडनी दान करण्यास संमती दिली. त्यानुसार किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. मुंबई येथील किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ एम एम बहाद्दर, डॉक्टर रैना यांनी २७ डिसेंबर २०२३ रोजी ही शस्त्रक्रिया केली. आयुष्यात कितीही मोठे संकट आले त्या संकटात पत्नी खंबीरपणे उभी राहिली तर संकट दूर होते, याचा प्रत्यय आला.
तब्बल सहा महिन्यांनंतर या दाम्पत्याचे ढेकूरोड लक्ष्मी नगरात आगमन झाले.त्यांचे फेटे बांधून ढोल, ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत केले. काॅलनीतील महिलांनी आरत्या करून पेढे भरवले. यावेळी ढेकरोड मित्रपरिवार व लक्ष्मीनगर मित्र मंडळाने सहकार्य केले. कॉलनीतील सर्व जेष्ठ महिला, पुरूष तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




