
अमळनेर : युरोप मध्ये नोकरी करत असलेल्या मुलांना लग्नाची चिंता भेडसावत होती म्हणून अमळनेर तालुक्यातील प्रवीण पाटील आणि महाराष्ट्रातील राहुल जोशी यांनी विदेशात पहिले वधू वर मंडळ स्थापन करून अविवाहित तरुणांची चिंता दूर केली आहे.
अनेक भारतीय तरुणांची पावले नोकरी व पैसा कमवण्यासाठी विदेशाकडे वळू लागली आहेत. मात्र मुले विदेशात गेल्यावर त्यांची लग्न करण्याची चिंता पालकांना असते. मुले विदेशात असल्याने मुलामुलींचा पाहण्याचा कार्यक्रम जमत नाही. पालकांनी स्थळ पाहून ठेवले असल्यास मुलांना पटत नाही किंवा ते येऊ शकत नाही. तसेच विदेशात डेटा प्रायव्हसी कायदा लागू असल्याने कोणीही कोणाची माहिती सोशल मिडियावर देखील शेअर करू शकत नाही. शेयर केला तर कायद्याने कारवाई होते. त्यामुळे स्थळ सुचवले जात नाहीत. तरुणांच्या लग्नाची खूप चिंता असायची. म्हणून अखेरीस जर्मनीत राहणारे अमळनेर तालुक्यातील प्रवीण पाटील व राहुल जोशी यांनी सविता पाटील आणि सुमित्रा जोशी यांच्या नावाने जे पी सर्व्हिसेस नावाचे शुभमंगल युरोप कंपनी स्थापन केली. डेटा सुरक्षेसाठी त्यांनी सुरक्षा अधिकारी नेमला आहे. उमेदवारांचे फोन नंबर आणि इमेल आयडी वेरीफाय करून नावे नोंदली जातात. त्यात त्यांच्या अपेक्षा , मुलगी कशी ,शिक्षण आदींची नोंद केली जाते. भारतातून देखील वधू वरांची नोंद होऊ शकते. हे वधू वर मंडळ एका समाजासाठी नव्हे तर सर्व जाती धर्मासाठी आहे. 2 जून ला स्थापन झालेल्या वधू वर मंडळात १५० सभासद झाले असून १३ जुलैला रोजी युरोप खंडातील भारतीयांचा पहिला वधू वर मेळावा संपन्न होत आहे. प्रवीण पाटील आणि राहुल जोशी यांच्या प्रयत्नाने विदेशातील भारतीय एकमेकांना जोडले जाणार आहेत.




