
अमळनेर:- दहावी नॅशनल स्लिंग शॉट चॅम्पियनशिप -2024 शिर्डी (महाराष्ट्र) येथे स्लिंग शॉट असोसिएशन ऑफ इंडिया व सिलिंग शॉट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली. यात अमळनेर तालुक्यातील दोघांनी यश मिळवले आहे.
संघटनेचे सचिव लवकुमार जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात महाराष्ट्राच्या संघाकडून 25 वर्ष वयोगटा अंतर्गत तुषार दिलीप चव्हाण या खेळाडूने अंतिम फेरीत ब्राँझ मेडल (3 रा क्रमांक) व तसेच 19 वर्षातील वयोगटाअंतर्गत कुंदन बापु शिरसाठ या खेळाडूने सिल्वर मेडल (2 रा क्रमांक) प्राप्त केले. हे दोन्ही खेळाडू जळगाव जिल्हा स्लींग शॉट असोसिएशनचे खेळाडू असून ते अमळनेर तालुक्यातील मारवड या गावाचे रहिवासी आहेत. तुषार चव्हाण याचे वडील मारवड महाविद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत असून कुंदन शिरसाठचे वडील शेतकरी आहेत. त्यांचे सर्वत्र कौतुक अभिनंदन होत आहे त्यांना जळगाव जिल्ह्याचे सेक्रेटरी सचिन बापूराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले व संघटनेचे पदाधिकारी चंद्रशेखर देसले व डॉ.देवदत्त पाटील यांनी शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे. निवड यादीत त्यांचे नाव आल्यास त्यांची चीन येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याची संधी प्राप्त होईल. त्यावेळी लोकप्रतिनिधींनी आर्थिक सहाय्य केल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर तालुक्याचे नाव झळकेल असा आशावाद त्यांच्या पालकांनी व्यक्त केला आहे.




