
अमळनेर : सततच्या पावसामुळे वातावरणात बदल झाला आहे. दूषित पाणी आणि हवा यामुळे अमळनेर चे आरोग्य बिघडले आहे. अनेक नागरिकांना ताप ,सर्दी ,खोकला , हगवण यासारखे आजार होऊ लागल्याने दवाखान्यात गर्दी वाढली आहे.
गेले सात आठ दिवस सतत पाऊस पडला. अमळनेर तालुक्यात आतापर्यंत सव्वा महिन्यात ३७२ मिमी पाऊस म्हणजे वार्षिक पावसाच्या ५५ टक्के पाऊस पडून गेला आहे. शहरात अनेक रिकाम्या प्लॉट , खुले भूखंडात पाण्याचे डबके साचल्याने डास ,मच्छर ,माशा , कीटक यांची पैदास वाढली आहे. तसेच तापी नदीलाही हतनूर धरणाचे पाणी सोडले असल्याने व काही ठिकाणी पाईप लाईन लिकेज मुळे गढूळ पाणी येते. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत.
ग्रामीण रुग्णालयात ताप ,सर्दी ,खोकला असे साधारणतः २०० रुग्ण येत आहेत. पावसाळ्यात वातावरण बदलामुळे आरोग्यावर परिणाम होतातच- डॉ प्रकाश ताळे , ग्रामीण रुग्णालय, अमळनेर
दूषित पाणी ,हवामान किंवा व्हायरल विषाणूमुळे नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. मात्र दोन दिवसात बरे देखील होत आहेत. पावसाच्या वातावरणात नागरिकांनी खाण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे.- डॉ उमेश सोनवणे , अमळनेर
रस्त्यावर तसेच पालिकेच्या खुल्या भूखंडात कीटक नाशक तण नाशक फवारणी व स्वच्छता सुरू आहे. मात्र नागरिकांच्या खाजगी प्लॉट मधील घाणीची ,कचऱ्याची साफसफाई झाली पाहिजे.- तुषार नेरकर , मुख्याधिकारी ,नगरपरिषद ,अमळनेर




