
अमळनेर : नववीत असताना बापाचे छत्र हरवले, घरात दारिद्र्य वाकुल्या दाखवत होते …आईने मजुरी करून शिक्षण केले, अन आईच्या कष्टाचे चीज करत धनंजय पहिल्याच प्रयत्नात विजय मिळवून फौजदार झाला.
अमळनेर तालुक्यातील धनंजय राजेंद्र कोळी नुकताच एमपीएससी परीक्षेत ४४० पैकी ३०१.५० गुण मिळवून पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. इयत्ता नववीत असतानाच २०१५ मध्ये धनंजय चे वडील राजेंद्र कोळी यांचे निधन झाले. राजेंद्र कोळी यांच्या दवाखान्याच्या खर्चामुळे डोक्यावर कर्ज झाले होते. दोन मुले ,दोन मुलींची पालन पोषण आणि लग्नाची जबाबदारी आईवर येऊन ठेपली होती. एका मुलीचे लग्न झाले होते. आईने रात्रंदिवस कष्ट करून दुसरी मुलगी आणि मोठ्या मुलाचे लग्न केले. एक इंच सुद्धा जमीन नसल्याने आईला मजुरीशिवाय पर्याय नव्हता. म्हणून धनंजय आणि त्याचा मोठा भाऊ कामासाठी सुरतला गेले. अधूनमधून येत अकरावी पूर्ण केली. नंतर परत येऊन १२ वि पर्यंत शिक्षण अमळगाव येथे झाल्यानन्तर आईने धंनजय ला अमळनेर प्रताप महाविद्यालयात शिक्षणासाठी पाठवले. परिस्थितीची जाणीव असल्याने धनंजय ने महाविद्यालयात शिक्षण घेता घेता घेता ‘कमवा शिका योजना’ मध्ये सहभाग घेतला. खेड्यावरून ये जा करून महाविद्यालयात राबून मिळेल त्या वेळेत अभ्यास करत होता. त्याच पैशांवर शिक्षण घेऊन धनंजय ने पदवीचे शिक्षण २०२१ मध्ये पूर्ण केले. २०२२ मध्ये लागलीच एमपीएस्सी परीक्षा जाहीर झाली. पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली. आणि पहिल्याच प्रयत्नात धंनजय उत्तीर्ण झाला. एका गरीब घराण्यातील मुलगा कष्ट करून अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात फौजदार झाल्याने सर्वत्र त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




