अमळनेर : घरमालक नमाज पठण करायला गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घर साफ करून सुमारे अडीच ते तीन लाखाचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना १४ रोजी सायंकाळी साडे सहा ते साडे नऊ दरम्यान न्यू प्लॉट मध्ये घडली.
शहरातील राज फुटवेयर चे मालक तथा न्यू प्लॉट भागातील दादावाडी समोरील रहिवासी जुजर फजलहुसेन बोहरी हे सायंकाळी साडे सहा वाजता नमाज पठण करण्यासाठी त्यांच्या मशिदीत गेले होते. साडे नऊ वाजता ते परत आले असता त्यांना घराचा दरवाजा तोडून घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटातील कपडे व सामान फेकून सुमारे ४० ग्रॅम सोने आणि २५ हजार रुपये रोख असा ऐवज चोरून नेल्याने समजले.
पोलिसांना घटना कळताच पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ , हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कोठावदे , मिलिंद सोनार , देशमाने यांनी भेट देऊन पाहणी केली.