
पोलिसांच्या तत्परतेचे आणि आंदोलनकर्त्यांच्या संयमाचे कौतुक…
अमळनेर:- गणेश मिरवणुकीत विघ्न आणणाऱ्या खऱ्या आरोपीचा पोलिसांनी शोध घेऊन त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा प्रयत्न करणे आणि धर्म जाती पंथ विरोधी तसेच धार्मिक जमावास व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१५ सप्टेंबर रोजी अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागातील पारधीवाडा भागातील दोस्ती ग्रुप व जय मातादी गणेश मंडळाची मिरवणूक जात असताना अनारकली मोहल्ल्यात एकाने मिरवणुकीतील लोकांवर दगड मारले. त्यामुळे शहरात संतप्त वातावरण निर्माण झाले होते. हिंदुत्ववादी संघटना एकत्र येत फरशी पुलाजवळ मिरवणूक थाम्बवून ठिय्या मांडण्यात आला होता. घटनास्थळी डीवायएसपी सुनील नंदवाळकर , पोलीस निरीक्षक विकास देवरे , सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश गावित , पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ ,पोलिस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे ,नामदेव बोरकर यांनी तगडा बंदोबस्त ठेवून आंदोलन कर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. खासदार स्मिता वाघ यांनीही शांततेचे आवाहन केले होते. शहरासह इतरत्र कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून डॉ संजय शहा , विजय पाटील ,सूरज परदेशी ,राकेश पाटील यांच्याशी चर्चा करून आंदोलन स्थगित करून मिरवणूक सुरू करण्यात आली.
त्याचवेळी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी ,अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर हे देखील हजर होऊन विविध ठिकाणी बंदोबस्त तैनात केला. तदनंतर अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर ,डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोनि विकास देवरे या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली. संबंधीत व्हिडिओची खात्री करण्यात आली. मिरवणुकीत विघ्न आणणारा आरोपी साबीर कैसर शेख असल्याची खात्री झाली. तपासाधिकारी जगदीश गावित यांनी आरोपीला अटक केली. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ११० , २९८ , २९९ ,३०० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्या अमिता यादव यांनी आरोपीस २० सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी समतोल साधत दोन्ही बाजूने शांतता निर्माण करत खरा आरोपी शोधून त्याला जेरबंद केल्याबद्दल पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. आंदोलनकर्त्यांनी देखील संयम राखला त्याबद्दल पोलिसांनी त्यांचेही कौतुक केले आहे.




