
अनेक मंडळाच्या मिरवणूक ठरल्या लक्षवेधी,अनेकांनी दिवसाच काढल्या मिरवणुका
अमळनेर :-गणेशोत्सवाच्या अखेरच्या दिवशी शहरात 48 मंडळांच्या मिरवणूका निघून शांततेत गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला.प्रामुख्याने दगडी दरवाजाच्या आतून आलेल्या मिरवणुका लक्षवेधी असल्याने सदर मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
अनेक मंडळांनी दिवसा तर अनेकांनी जागेवरच वाद्य वाजवून वेळेच्या आत विसर्जन केले. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त ठेवला होता. मिरवणूक सुरक्षित आणि शांततेत पार पाडण्यासाठी ,कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हॅन्डी कॅमेरे आणि दोन ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने करडी नजर ठेवण्यात आली होती. अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर स्वत नियंत्रण ठेऊन होत्या.तर पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्यासह एक अप्पर पोलीस अधिक्षक , दोन डीवायएसपी , तीन पोलीस निरीक्षक , १५ सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक , एक आरसिपी प्लाटून , एक एसआरपीएफ , दोन ट्रॅकिंग फोर्स ,१०० पुरुष कर्मचारी , ५० महिला, कर्मचारी १०० होमगार्ड असा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.प्रांताधिकारी महादेव खेडकर,तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व मुख्याधिकारी तुषार नेरकर हे देखील परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन होते.
पालिका विद्युत विभागाने विविध चार ठिकाणी जनरेटरची व्यवस्था केल्याने दोनदा लाईट जाऊनही गोंधळ उडाला नाही.माळीवाड्यातील त्रिमूर्ती मंडळाचा धार्मिक सजीव देखावा,जयबजरंग मंडळाचा शिवकालीन सजीव देखावा आणि मंगलपूर्ती गणेश मंडळाची वारकऱ्यांची मिरवणूक पाहण्यासाठी दगडी दरवाज्यात मोठी गर्दी झाली होती.गणेश भक्तांनी गुलालाची उधळण करीत जोरदार ठेका धरला.विशेष करून दगडी दरवाजात गणेश मंडळांना पुढे काढताना पोलीस प्रशासनाची मोठी कसरत झाली.मोठ्या गणेश मूर्त्यांचे तापी नदीवर सावखेडा,सावळदे व जळोद येथे तर लहान मूर्त्यांचे परिसरातील जलाशयात विसर्जन झाले.
दरम्यान मिरवणूक मध्ये मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण झाल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी पालिकेच्या आरोग्य विभागाने मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबवून रस्त्यावरून तब्बल 6 ट्रॅक्टर गुलाल संकलित केला.




