
अमळनेर:- संपूर्ण आयुष्य रुग्णांच्या सेवेसाठी घालवणाऱ्या डॉ. सतीश विनायक सोनवणे यांच्या निधनाने त्यांच्या कर्मभूमीत हळहळ व्यक्त केली जात असून खऱ्या अर्थाने देवमाणूस हरवला असे शब्द आपसूकच जनतेच्या तोंडून निघत आहे.
पूर्वी डॉक्टरांना देव मानले जायचे मात्र सध्याची परिस्थिती वेगळी आहे. जराही मनासारखे झाले नाही तर डॉक्टरांना शिवीगाळ, दमदाटी, आणि वेळप्रसंगी दगडफेक असे प्रकार होतात. मात्र मूळचे मुडी येथील रहिवासी असलेले डॉ सतीश विनायक सोनवणे या डॉक्टरांची जीवन कहाणी औरच आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून डॉ सतीश सोनवणे कळमसरे येथे प्रॅक्टिस करत होते. पैशासाठी नव्हे तर रुग्णसेवेसाठी ग्रामीण भागात त्यांनी प्रॅक्टिस केली. गोरगरीब रुग्णांना इंजेक्शने ,गोळ्या औषधी मोफत दिले. रुग्णाला नेहमीच योग्य सल्ला दिला. कोरोना काळात आणि चिकन गुनियाच्या साथ रोगात अनेक डॉक्टर श्रीमंत झाले. मात्र डॉ सतीश सोनवणे अशाच काळात गरिबांच्या मागे उभे राहिले. संपूर्ण कळमसरे परिसरात गरीब रुग्णांना त्यांचा आधार होता.
डॉक्टरांची मुले हर्षल सोनवणे आणि भूषण सोनवणे नोकरी करतात त्यांनी अनेकदा डॉक्टरांना सांगितले की, आता आराम करा घरीच राहा मात्र त्यांनी शहरात न जाता ग्रामीण भागातच रुग्णसेवा करण्याचे ठरवले. नुकतेच काही दिवसांपूर्वी ते आजारी पडले तेव्हा गावकऱ्यांनी त्यांच्यासाठी निधी गोळा केला. मुले उपचारासाठी नेत असताना गावकऱ्यांनी आग्रह धरला की आयुष्यभर आमच्या उपचारासाठी तळमळ करणाऱ्या डॉक्टरांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आम्हाला संधी द्या म्हणून सारा गाव गोळा झाला. गरीब भिल्ल समाजाच्या व्यक्तीपासून तर श्रीमंतापर्यंत सर्वांनी आर्थिक योगदान दिले. दुर्दैवाने डॉक्टरांचा आजारपणामुळे मृत्यू झाला सारा परिसर हळहळला. आधी आम्हाला डॉक्टरांचे अंत्यदर्शन घ्यायचे आहे म्हणून कळमसरे गावात अंत्ययात्रा काढली जाईल मग अमळनेरला त्यांच्या घरासमोरून अंत्ययात्रा निघेल असा आग्रह गावकऱ्यांनी धरल्याने या देवमाणसाची अंत्ययात्रा आधी कळमसरेत निघाली त्यावेळी सारा गाव व पंचक्रोशीतील नागरिक आले होते. प्रत्येकाच्या तोंडून एकच वाक्य निघत होते ‘देवमाणूस गेला हो….’




