
सापडलेली 2 तोळ्याची सोन्याची पोत केली परत..
अमळनेर:- तालुक्यातील निंभोरा येथे नवरात्र उत्सव असल्याने परवा सायंकाळी देवीचा भंडारा होता. आरतीला उपस्थित राहण्यासाठी ग्राप सदस्य पायल पाटील, कौमुदी पाटील, विनोद पाटील, सुनील पाटील हे आमंत्रित होते. देवीची आरती आटोपल्यावर कौमुदी पाटील यांच्या गळ्यात सोन्याची पोत होती. त्यानंतर सरपंच चंद्रकलाबाई पाटील यांच्यासोबत पायल पाटील, कौमुदी पाटील, राजश्री धनगर,उज्वला पाटील यांनी गावातील इतर मंडळांच्या देवी देवतांचे दर्शन घेतले. त्या दरम्यान त्यांच्या गळ्यातील साधारण 2 तोळ्याची सोन्याची पोत कुठेतरी पडल्याचे तासाभराने त्यांच्या लक्षात आले. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. मिलिंद पाटील व मित्रांनी तर दोन वेळा सर्व रस्त्यांची पाहणी केली. शोध मोहीम सुरू असताना तासाभराने कळले की, गावातीलच दिनेश विश्वास पाटील यांच्याकडे शेती काम करणारा गोपाल पावरा नामक व्यक्तीला ही पोत सापडल्याचे समजले. त्याने ही वस्तु सापडल्यानंतर आपल्या मालकीण बाईकडे देऊन तो त्याच्या झोपडीत जाऊन झोपी गेला. तिकडे कौमुदी पाटील यांना सुद्धा आपली पोत सापडल्याचे समजताच जीवात जीव आला. गोपाल पावरा हा आदिवासी समाजाचा असून प्रतिकूल परिस्थितीत जगत आहे. अत्यंत मेहनती आहे. हे जग सोडून गेलेल्या मोठ्या भावाची 2 मुले व वडिलांचा तो आजही सांभाळ करीत आहे. स्वतः स्वयंपाक करून दिवसभर शेतात काम करीत असतो.सध्या त्याने सुद्धा देवीचे उपवास केले आहेत.आजच्या स्वार्थी जगात गोपाल चा निस्वार्थ व प्रामाणिकपणा अनेकांना प्रेरणा देत आहे.
नंतर सर्वांनी गोपालच्या मालकाकडे जाऊन गोपालची भेट घेतली. त्याचे खूप कौतुक केले. याप्रसंगी गोपालला रोख स्वरूपात बक्षीस देण्यात आले. गोपालच्या या प्रामाणिकपणाचे संपूर्ण गावात कौतुक होत आहे.




