
अमळनेर:- तालुक्यातील निम येथे एलसीबी आणि मारवड पोलिसांनी गावठी दारूच्या भट्टीवर छापा टाकून एकास ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव येथील पोहेकॉ संदिप पाटील, पोकॉ विलास गायकवाड तसेच मारवड पोलिस ठाण्याचे पोहेकॉ सुनिल तेली व पोहेकॉ मुकेश साळुंखे यांनी निम येथे जावून पाहणी केली असता तापी नदीच्या काठी एक इसम हा एका प्लास्टीकच्या ड्रम मध्ये लाकडी काठीने काहीतरी ढवळताना दिसला. त्याच्यावर छापा टाकुन जागीच पकडले व त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव संदिप जिजाबराव कोळी (वय 26 वर्षे रा.निम ता.अमळनेर) असे सांगीतले. त्याठिकाणी ८० हजार रुपये किमतीचे १६०० लिटर गुळ नवसागर मिश्रीत कच्चे रसायन, १५ हजार रुपये किमतीचे ३०० लिटर उकळते पक्के रसायन २५ हजार रुपये किमतीची २५० लिटर तयार दारु असा एकूण १,२०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा नाश करण्यात आला. सदर आरोपीविरुद्ध मारवड पोलिसांत महाराष्ट्र दारुबंदी अधिनीयम कलम ६५ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ सुनिल तेली हे करीत आहे.




