
पत्र दाखवत केला होता मोठा गाजावाजा, मात्र निधीचा थांगपत्ता अद्याप नाही…
अमळनेर:- मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार शिरीष चौधरी यांनी नाबार्डच्या कर्जातून धरणासाठी पंधराशे कोटी मंजूर झाले असल्याचे सांगत मोठा गाजावाजा करत श्रेयबाजी केली होती. मात्र नंतर ही फक्त जुमलेबाजी ठरली होती.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ऑगस्ट २०१९ मध्ये निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाला नाबार्डच्या कर्जातून पंधराशे कोटी रुपये खर्चास मंजूरी मिळाल्याचे पत्र दाखवण्यात आले होते. त्याचबरोबर आमच्या प्रयत्नांनी हा निधी मिळाला असून आता धरण पूर्णच होणार असे सांगण्यात आले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत हार पत्करल्यानंतर माजी आमदार आणि हा निधी दोन्हींचा थांगपत्ता लागला नाही. यंदाच्या निवडणुकीत माजी आमदार पुन्हा भूलथापा द्यायला परत आले मात्र तालुक्याची जनता अजूनही ह्या पंधराशे कोटींच्या प्रतीक्षेत असल्याचे विरोधकांनी सांगितले आहे. त्याचबरोबर धरणाला पांढरा हत्ती म्हणणाऱ्या कडून कधीच धरण पूर्ण होणार नाही, त्यांची पाच वर्ष फक्त दिशाभूल करण्यातच गेली असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.




