
सात लाख १९ हजार २०० रुपयांची रोख रक्कम व सोन्याचे दागिने केले लंपास…
अमळनेर : तालुक्यातील दहिवद येथे अज्ञात चोरट्यानी भरदिवसा पाच घरांचे कुलूप उघडून एकूण सात लाख १९ हजार २०० रुपयांची रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना २६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ च्या दरम्यान घडली.

केतन ताथु माळी हे २६ रोजी सकाळी ८ वाजता शेतात कामाला निघून गेले होते. त्यांनी घराची किल्ली बाहेर सरई वर ठेवली होती. सायंकाळी सहा वाजता घरी परतल्यावर त्यांना घर उघडे दिसले. घरातील कोठीत ठेवलेले पैसे आणि सोन्याचे दागिने दिसून आले नाहीत. त्याचप्रमाणे गावातील आणखी चार घरे उघडून चोरट्यानी चोऱ्या केल्याचे समजले.
केतन माळी यांच्या घरातून ३ लाख २५ हजार रुपये रोख, ७ ग्रॅम सोन्याचे झुबे , ३ ग्रॅम सोन्याचे दागिने , २ ग्रॅम सोने , ११ तोळे चांदी , १० तोळे चांदी , ५ तोळे चांदीचे वाळे ,३ तोळे चांदीचे कडे असा एकूण ३ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. हरीलाल तापीराम माळी यांच्या घरातून ५० हजार रुपये रोख, १२ ग्रॅम सोन्याचे झुबे , १० ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या , ६ ग्रॅम वजनाच्या २ अंगठ्या ,१६०० रुपयांची चांदी , २ हजार रुपयांच्या चांदीचे वाळे असा एक लाख ३७ हजार रुपयांचा ऐवज , राजेंद्र शंकर पाटील यांच्या घरातून ३० ग्रॅम सोन्याची माळ , १७ ग्रॅम सोन्याची मिनीमाळ ,६ ग्रॅम सोन्याचे झुबे, ४ ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या १५०० सोन्याचे दागिने असे एकूण १ लाख ७२ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. अविनाश सैतान माळी यांच्या घरातून सहा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने , राजेंद्र रुपचंद पाटील यांच्या घरातून ८ हजार रुपये रोख असा एकूण ३ लाख ८३ हजार रूपये रोख, १०९ ग्रॅम सोन्याचे दागिने व ३४ तोळे चांदी असा एकूण ७ लाख १९ हजार २०० रुपयांचा माल चोरीस गेला आहे.
घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे , पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ , हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, उज्वल म्हस्के , प्रशांत पाटील , एलसीबी चे संदीप पाटील , राहुल कोळी तसेच श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनी भेटी देऊन पंचनामे केले.
अमळनेर पोलीस स्टेशनला केतन माळी याच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३) व कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.




