
प्रशासनाच्या निष्क्रियतेने वाळू चोरांची वाढली दबंगगिरी, मात्र शेतकऱ्यांचे नुकसान…
अमळनेर :- तालुक्यातील फापोरे बु. येथील गावाजवळ
वाळू चोरांची दबंगगिरी वाढलेली असून बोरी नदीतील साठवण बंधाऱ्याच्या पाट्या काढून साचलेले पाणी नदीपात्रात सोडून वाळू चोरी मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

फापोरे बु . येथील सिताराम महाराज देवस्थाना जवळील बोरी नदीवर बांधण्यात आलेला साठवण बंधारा हा या वर्षी आता पर्यंत पूर्ण क्षमतेने पाण्याने भरला असून त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा बागायती साठी या वर्षी शेतकऱ्यांना होणार आहे. मात्र डोळ्या समोर साठवण बंधाऱ्यात मुबलक प्रमाणात नदी पात्रात पाणी दिसत असल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पेरणी केली असून सर्वत्र बागायत शेती क्षेत्र वाढलेले दिसून येत आहे.या वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांचे निर्सगाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून तो हंगाम गेला असे म्हणत आता पाणी आहे म्हणून रब्बी हंगामात घट झालेल्या उत्पनांची कसर काढण्यास शेतकरी रात्र दिवस एक करत असताना अश्यातच वाळू चोर साठवण बंधाऱ्यातील पाणी नदीपात्रात सोडून वाळू चोरी करून शेतकऱ्यांचे शेतीचे पाणी वाया घालवून शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याचे काम करीत आहेत.
या भागातील वाळू चोरी अशीच चालत राहिल्यास भविष्यात नदी काठावरील गावाना शेती साठी तर दुर परंतू पिण्यास देखील पाणी मिळणार नाही. शासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ करत आहेत.




