
अग्निशमन दलाने वाचवले कबुतराचे प्राण…
अमळनेर : पतंगाच्या मांजामुळे उंच झाडावर अटकलेल्या कबुतरला अग्निशमन दलाने वाचवून त्याला नैसर्गिक वातावरणात सोडण्यात आले. तर मांजामुळे गलवाडे येथील बारा वर्षीय बालकाचे बोट कापले गेल्याची घटनाही मकर संक्रातीला घडली.
महाराणा प्रताप चौकात प्रकाश नारायण पाटील यांच्या घरावर सायंकाळी एक कबुतर झाडावर परतत असताना अचानक पतंगाच्या मांजामध्ये अडकले. सुटका करण्याच्या प्रयत्नात मांजा कबुतराच्या गळ्याला व पंख तसेच पायाला गुंडाळला गेल्याने ते अधिक गुरफटले गेले. सीमा बेकरीचे संचालक रोहित भोपे यांना ही बाब निदर्शनास आल्यावर त्यांनी पत्रकार संजय पाटील यांना सांगितले. त्यांनी पक्षीमित्र अश्विन पाटील व अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी यांना मदतीसाठी तात्काळ बोलावले.
कबुतर झाडाच्या बारीक फांद्यांवर उंच ठिकाणी अडकल्याने शिडीने अथवा झाडावर चढणे कठीण होते. अग्निशमन दलाचे कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे , फारुख शेख , जफर पठाण , आकाश बाविस्कर यांनी महत्प्रयासाने कबूतराची सुटका केली. त्याच्या मानेला व पंखाना गुंडाळलेला मांजा काढला व पाणी पाजून निसर्गात मुक्त करण्यात आले.
दरम्यान गलवाडे येथे एका १२ वर्षाच्या मुलाचा मांजामुळे बोट कापले गेल्याची घटना घडली. तर नवीन ८० फूट रस्त्यावर एक इसम तीन शीट मोटरसायकलवर जात असताना त्याच्या खांद्यावर मांजा अडकला नागरिकांनी वेळीच सावध केल्याने अनर्थ टळला. कबूतराची सुटका करण्यासाठी पक्षीमित्र अश्विन पाटील , प्रकाश पाटील , रोहित भोपे , संजय पाटील यांचेही सहकार्य मिळाले.




