
विश्वकर्मा महिला मंडळाचा अभिनव उपक्रम
अमळनेर:- येथील विश्वकर्मा सुतार समाज महिला मंडळाने आयोजित केलेला हळदी कुंकू कार्यक्रम एक आनंददायी अनुभव बनला. या कार्यक्रमात, जुन्या रूढी परंपरांना छेद देत समाजातील विधवा महिलांना सहभागी करून त्यांचा विशेष सन्मान करण्यात येऊन आयोजित कार्यक्रमात त्यांच्या सन्मानार्थ ‘वाण’ देण्यात आले.

कार्यक्रमात जयश्री अनिल पाटील आणि गायत्री दिपक पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, पत्रकार संभाजीराव देवरे यांना मंडळाकडून पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.महिला मंडळाने विविध खेळ आणि स्पर्धा आयोजित केल्या, ज्यामध्ये ठिपक्यांची रांगोळी, सासू-सून हेअर स्ट्रॉ, इटिंग बिस्कीट, फॅशन शो, बकेट बॉल, उखाणे स्पर्धा आणि अन्य गमतीदार खेळांचा समावेश होता. या सर्व स्पर्धांमध्ये सर्व महिलांनी उत्साहाने भाग घेतला.
महिला मंडळाच्या प्रमुख जान्हवी विकास बोरसे यांनी या कार्यक्रमाचे प्रभावी नियोजन केले. विधवा महिलांचे मानसिक सक्षमीकरण आणि सामाजिक सन्मान मिळवणे ह्या उद्देशाने कार्यवाही करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळ कार्यकारिणी सदस्यांनी उत्कृष्ट परिश्रम घेतले. भारती अमित जगताप, अनिता प्रदिप खैरनार, शितल सोनू खैरनार, जयश्री सुभाष देवरे आणि अन्य सदस्यांनी मोठ्या मेहनतीने या कार्यक्रमाला आकार दिला.आदल्या दिवशी, १ फेब्रुवारी रोजी ठिपक्यांची रांगोळी स्पर्धा घेण्यात आली, ज्यात ७० वर्षांपर्यंतच्या वृद्ध महिलांनी देखील सहभाग घेतला. ठिपक्यांची कला आणि तिचे मानसिक आणि शारीरिक लाभ याबद्दल सौ जान्हवी बोरसे यांनी माहिती दिली.
सर्व विजेत्यांना मंडळाकडून बक्षीस देण्यात आले, तसेच वृद्ध महिलांचा सन्मान राखण्यासाठी सर्व स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. अमळनेर विश्वकर्मा सुतार समाज महिला मंडळाने या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्रित महिला सशक्तीकरणाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे.




