
छत तकलादू झाल्याने अंत्यविधीसाठी आलेल्यांचाच जीव धोक्यात
अमळनेर-येथील ताडेपुरा भागातील नगरपरिषद मालकीच्या स्मशान भूमीची मोठी दुरावस्था होऊन अंत्यविधी शेडचे छत तकलादू झाल्याने केव्हांव्ही पडण्याची भीती असल्याने अंत्यविधीसाठी आलेल्यांचाच जिव धोक्यात आला आहे.
त्यामुळे शहरातील कुणीही नागरिक अंत्यविधी साठी या स्मशानभूमीत येत असतील तर त्यांनी जरा काळजीच घ्यावी अन्यथा केव्हाही विपरीत घडण्याची शक्यता नाकारता येत नाही असा इशारा माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी यांनी देत याबाबत पालिकेकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.सदर स्मशानभूमीत असलेल्या शेड पैकी काही शेड ची काही दिवसांपासून अत्यंत दुरावस्था झाली असताना पालिका लक्ष देत नसल्याने लोकांच्या जीवाशी खेळले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.सदर स्मशानभूमी शहराची मुख्य स्मशानभूमी असून याठिकाणी दररोज पाच ते सहा अंत्यसंस्कार होत असतात,यामुळे दिवसभर येणाऱ्यांची वर्दळ असते,लोकांचा जीव अनमोल असल्याने पालिकेने तातडीने लक्ष घालून छत दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान याठिकाणी असलेल्या सांत्वन शेड मध्ये नेहमीच घाणीचे साम्राज्य राहत असल्याने नियमित स्वच्छता व्हावी तसेच रात्रीच्या वेळेस अंत्यसंस्कार साठी अडथळा येऊ नये म्हणून विद्युत दिव्यांची संख्या वाढवावी अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.




