
अमळनेर : शहरातील मतिमंद विद्यार्थी शिक्षण मंडळ संचलित ममता विद्यालयातील नऊ वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षिका माधुरी शुक्ल यांनी २५ वर्षांपूर्वी शाळा सोडलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क करून प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन रविवारी आपल्या घरी स्नेहमेळावा आयोजित केला होता. कदाचित दिव्यांग विद्यार्थ्यांचा हा पहिला स्नेहमेळावा असावा.
या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मिलिंद वैद्य हे उपस्थित होते. मेळाव्याची सुरुवात खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने झाली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय व मनोगत व्यक्त करताना आपण सध्या करत असलेल्या कामाबद्दल तसेच शाळेतील शिक्षिका माधुरी शुक्ल, मंगला पुराणिक व इतर शिक्षकांच्या संस्कार व मार्गदर्शनाने स्वावलंबी व आनंददायी जीवन जगत असल्याचे सांगितले. सर्व विद्यार्थी तब्बल २५ वर्षांनी एकमेकांना भेटल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. एकमेकांचे सुखदुःखाचे प्रसंग ऐकत असताना उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले, शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत सर्वांनी एकमेकांशी संवाद साधला. विवेक शिरसाठ याने पसायदान म्हटले. या स्नेहमेळाव्यात अकरा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सर्व विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत बालपणातील आनंददायी प्रसंग, गप्पागोष्टी,गीते व कविता गायन करून आपला स्नेहमेळाव्यातील आनंद द्विगुणित केला. यापैकी काही जण काहीना काही कमवत आहेत. मेळाव्याच्या शेवटी सर्वांनी सामूहिक राष्ट्रगीताचे गायन केले. मधुकर शुक्ल यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत स्नेहमेळाव्याचा समारोप करण्यात आला. त्यानंतर सर्वांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला. प्रत्येक विद्यार्थ्याला भेटवस्तू देण्यात आली. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनीषा वैद्य, रवींद्र चौधरी,मोर्विका वैद्य, यांनी परिश्रम घेतले.




