
अमळनेर:- शहरातील फळ गल्ली, कुंठे रोड येथे केळी विक्रेत्यावर प्राणघातक हल्ल्याची घटना घडली आहे. व्यवसायिक वादातून चार आरोपींनी तरुण फळ विक्रेत्यावर चाकूने हल्ला केला. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये भा.दं.वि. कलम १०९, ११५, ३५१ (२), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, शाहिद रहीम बागवान (वय १८) रा. अब्बासिया मस्जिद जवळ बाहेपुरा अमळनेर हा केळी विक्रीचा व्यवसाय करतो. त्याचा व्यवसाय चांगला चालत असल्याने आरोपींनी त्याच्यावर वारंवार दबाव आणण्याचा प्रयत्न केला. १५ मार्च रोजी संध्याकाळी ५.३० वाजता रईस राजू बागवान रा. शाहआलनगर व त्याच्या साथीदारांनी किरकोळ कारणावरून शाहिद बागवान याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर शाहरूख हनीफ बागवान याने लोखंडी टरबूज कापण्याच्या चाकूने त्याच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शाहिदने तो वार डाव्या हाताने अडवल्याने हात जखमी झाला आणि चाकूचा वार कपाळावर लागला. घटनेनंतर जखमी शाहिदला तातडीने नर्मदा फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांनी शाहिद बागवानच्या तक्रारीवरून रईस बागवान, राजू बागवान, अनिस हनीफ बागवान आणि शाहरूख हनीफ बागवान या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत.




