
सुदैवाने तिघे बचावले, शहरात अनेक ठिकाणी धोकादायक पद्धतीने बांधकामे सुरू…
अमळनेर:- कोट्यावधी रुपये कमावण्याच्या नादात शुल्लक सुरक्षित साधनांकडे दुर्लक्ष करीत बांधकाम सुरू असलेल्या व्यापारी संकुलाचा स्लॅब अचानक कोसळल्याने तीन जण बालबाल बचावले. शहरात अनेक ठिकाणी अशी धोकेदायक बांधकामे सुरू असून निर्ढावलेल्या ठेकेदार आणि मुजोर प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

शहरातील न्यू प्लॉट भागातील नेहमी वर्दळीच्या रस्त्यावरील नर्मदा वाडीशेजारील खाजगी व्यापारी संकुलाच्या पहिल्या मजल्याच्या स्लॅब भरण्याचे काम चालू असताना सकाळी अकरा वाजता मुख्य रस्त्या लागत असलेला संकुलाचा प्रथमदर्शी मोठ्या भागाचा स्लॅब कोसळला. त्याचवेळी बांधकामा लागत असलेल्या रस्त्यावरून जाणाऱ्या तीन जणांना इतर लोकांनी समयसूचकता दाखवत वेळीच आवाज दिल्याने ते तिघेही सतर्क होऊन बाजूला सरकल्याने सुदैवाने थोडक्यात बचावले. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या बांधकामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची संरक्षणात्मक जाळी व बांधकाम कामगारांना सुरक्षा साधनांची उपलब्धता व धूळ उडणार नाही. याची काळजी, तसेच रस्त्याच्या बाजूला काम सुरू असल्याबाबतचा फलक लावणे, सुरक्षारक्षक ठेवणे यापैकी कुठलीही उपाययोजना खाजगी बांधकाम व्यवसायिक ठेकेदाराने केलेली नाही. त्यामुळे या व्यापारी संकुलातील गाळे व सदनिका विकून कोट्यावधी रुपयांची कमाई करणारे जागा मालक व बांधकाम व्यवसायिक सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असून संबंधित प्रशासन देखील याकडे डोळेझाक करत असल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत जागामालक व बांधकाम व्यवसायिकाशी संपर्क केला असता होऊ शकला नाही. तर अशा दुर्घटना शहरात होऊ नयेत. म्हणून शहरात संरक्षणात्मक जाळी व सुरक्षा साधनांविना शासकीय व खाजगी बांधकामे सर्रासपणे सुरू आहेत. त्याची संबंधित स्थानिक प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यामुळे आजची घटना घडली. म्हणून स्थानिक प्रशासनाने जागे होत शहरात रस्त्यालगत व शासकीय कार्यालयात नवीन व जुन्या इमारतींचे विस्तारणीकरणाचे काम सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपायोजना करण्याची व नियमाचे उल्लंघन करणाऱ्या ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. अन्यथा निरपराधारांचे बळी गेल्याशिवाय राहणार नाहीत, अशा भावना नागरिकांमधून उमटू लागल्या आहेत.
आवाज दिल्यामुळे तिघेही लागलीच दूर पळाल्याने सुदैवाने बचावले…
या मुख्य बाजाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर नेहमीच गर्दी असते. सदर बांधकामाच्या ठिकाणी स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना अचानक मोठा आवाज झाल्याने त्याकडे लक्ष गेले असता पुढील दर्शनी भागाचा स्लॅब कोसळल्याचे लक्षात येताच त्या खालून जाणाऱ्या तीन जणांना आम्ही जोराने आवाज दिल्यामुळे ते तिघेही लागलीच दूर पळाल्याने सुदैवाने ते बचावले अन्यथा अनर्थ घडला असता.
– जमील मुजावर, प्रत्यक्षदर्शी,
संबंधित मालक व ठेकेदारास देणार नोटीस
सदर घटना घडल्यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी लागलीच भेट देऊन सदर काम बंद केले. बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपायोजना केलेल्या नसल्याने संबंधित मालक व ठेकेदारास नोटीस देण्यात येऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
– तुषार नेरकर, मुख्याधिकारी, अमळनेर परिषद




