
अमळनेर : शहरात विविध ठिकाणी रस्ते , पाईपलाईन , भुयारी गटारींचे काम सुरू असल्याने अनेकदा पाईप तुटल्याने शहराच्या बऱ्याचशा भागात पाणी पुरवठा खंडित होऊन विलंब होत असल्याने एकप्रकारे कृत्रिम पाणी टंचाई होत आहे.

पूर्वी दोन दिवसांचा खंड पडल्यानंतर पाणी येत होते. नंतर टंचाई निर्माण झाली वीजबिल थकबाकी असल्याने आणखी आवर्तनाचा खर्च लागू नये म्हणून उन्हाळ्यात तीन दिवसांच्या खंडाने पाणी सुरू झाले. पुढे पाऊस पडला तरी पाण्याचे नियोजन बदलले नाही. नंतर भुयारी गटारी , वादळ , तारा तुटणे , लोड शेडिंग आदि कारणाने वारंवार पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याने नियोजन सुरळीत करण्यासाठी चार दिवसांचा खंड करण्यात आला आणि नागरिकांना सहाव्या दिवशी पाणी मिळू लागले. नागरिक बिचारे गुपचूप सहन करू लागले. आता पुन्हा ठिठिकाणच्या विकास कामांमुळे पाणीपूरवठ्यावर प्रचंड परिणाम होत आहे. काही वार्डात १० ते १४ दिवसांच्या खंडांनंतर पाणी पुरवठा होत आहे. दुरुस्तीला प्राधान्य दिले जात नसल्याने हळुवार पणे कामे होतात आणि त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे. नागरिक नियमित पाणी पट्टी कर भरतात , नदीला पाणी आहे ,जळोद डोह आटलेला नाही. तरी देखील नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणी पुरवठा मधील खंड कमी का केला जात नाही. यावर सामान्य जनता बोलत नाही आणि जनतेने निवडून दिलेले नगरसेवकही बोलत नाहीत. विरोधी गट देखील मूग गिळून बसलेला आहे. लोकसेवकाना कंत्राटमध्ये रस आहे. पाण्यासाठी माजी नगरसेवकांनी अथवा विरोधी गटाने आंदोलन अथवा मागणी केलेली आढळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. जनतेसाठी उन्हाळ्यात आवर्तन घ्यावे लागले तरी चालेल पण नियमित कर भरणाऱ्या नागरिकांना नियमित पाणी द्या अशी मागणी होत आहे. पाणी वाटपाचे नियोजन करा , ठेकेदाराला त्यांच्या माणसांवर सक्तीने नियमित कामे करायला सांगा पण पाणी द्या असा टाहो अमळनेरकरांनी फोडला आहे.
पाणी पुरवठ्यातील खंडाचे दिवस कमी करून योग्य नियोजन करण्याच्या सूचना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. – तुषार नेरकर ,मुख्याधिकारी अमळनेर नगरपरिषद




