
अमळनेर:- शासनाने राज्यातील १४ पोलीस अधीक्षकांना नुकतीच उपमहानिरीक्षक श्रेणीत पदोन्नती दिली आहे. त्यात जिल्ह्यातील अमळनेर तालुक्याच्या कावपिंपरी येथील मूळ रहिवासी असलेल्या मोक्षदा पाटील यांचाही समावेश आहे. त्यांना राज्य राखीव पोलीस बलाच्या उप महानिरीक्षकपदावर बढती मिळाली आहे.

२०११ तुकडीच्या आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील या ठाणे महानगरपालिकेतील निवृत्त नगर अभियंता अनिल पाटील यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत. पाटील कुटुंबाची अमळनेर तालुक्यातील कावपिंप्री येथे वडिलोपार्जित शेती व घर आहे. वडील नोकरीनिमित्त ठाण्यात स्थायिक असल्याने मोक्षदा पाटील यांनी मुंबई येथील झेविअर्स महाविद्यालयातून पदवी घेतली.

सामाजिक कार्याच्या आवडीतून नंतर पुकार संस्थेच्या कार्यात स्वतःला झोकून दिले. सामाजिक कार्याला प्रशासकीय किंवा पोलीस सेवेची जोड देण्यासाठी नंतर त्यांनी पुणे येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. २०११ मध्ये आयपीएस अधिकारी झाल्यानंतर मोक्षदा पाटील यांची नागपूर आणि नाशिक येथे परीविक्षाधीन पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर आपल्या मूळ जिल्ह्यात जळगाव येथे त्यांना काहीकाळ अपर पोलीस अधीक्षकपदी काम करण्याची संधी मिळाली. याशिवाय, त्यांनी वाशिम येथे आणि छत्रपती संभाजीनगरला ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर आता त्यांना मुंबईतील राज्य राखीव पोलीस बलाच्या समादेशक पदावरुन थेट पोलीस उपमहानिरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली आहे. मोक्षदा यांचे पती आयएएस अधिकारी आस्तिककुमार पांडेय हे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (एमएमआरडीए) सहायक आयुक्त पदावर सध्या कार्यरत आहेत.




