
अमळनेर : शहरातील विविध खुल्या भूखंडात पालिकेने आमदार अनिल पाटील यांच्या सहकार्याने खेळणी व मनोरंजक साहित्य लावल्याने मुले मोबाईल पासून दूर जाऊ लागली आहेत. व मैदानावर खेळू लागली आहेत.

अमळनेर शहरात अनेक खुले भूखंड ओस पडली होती. तेथे गवत वाढून , कचरा साचून दुर्गंधी पसरत होती. मुलांना खेळायला जागा मिळत नव्हती. त्यामुळे लहान मुले मोबाईल आणि टीव्ही पाहण्यात गुंग झाली होती. याचे दुष्परिणाम म्हणून मुले आजारी पडणे , प्रतिकार शक्ती कमी होणे ,दम लागणे , डोळ्यांना कमी दिसणे असा त्रास होत होता. शहरातील बालके सुदृढ आणि सक्षम करण्यासाठी आमदार अनिल पाटील , मुख्याधिकारी तुषार नेरकर , बांधकाम अभियंता डिगंबर वाघ यांनी शहरातील विविध खुल्या भूखंडात मुलांना खेळण्यासाठी विविध साधने , मनोरंजक साहित्य तसेच ओपन जिम उपलब्ध केल्याने लहान मुले मोबाईल आणि टीव्ही पासून दूर जाऊन मैदानावर खेळू लागली आहेत.

महिला तरुण देखील ओपन जिमवर व्यायाम करू लागली आहेत. मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याने त्यांच्यातली चिडचिड बंद झाली असून आजारी पडण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे.

प्रतिक्रिया…
संपूर्ण शहर ,मोठे डीपी रस्ते सुशोभित करून लहान मुलांपासून तर वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांना आनंद देणाऱ्या सुविधा निर्माण करून आनंदी अमळनेर बनवण्याचे स्वप्न आहे.- अनिल पाटील ,आमदार
प्रतिक्रिया…
नागरिकांनी खुल्या भूखंडातील साहित्याची काळजी घ्यावी ,स्वच्छता ठेवावी. खेळण्याची मोडतोड होणार नाही याची दक्षता घ्यावी. उर्वरित भूखंडांमध्ये देखील हळूहळू सुविधा पूर्ण केल्या जातील.- तुषार नेरकर , मुख्याधिकारी अमळनेर नगरपरिषद




