
तांबेपुरा, रामवाडी, सानेनगर भागातील नागरिकांनी व्यक्त केल्या संतप्त भावना…
नगरपरिषदेच्या असमतोल विकासाचे अनोखे मॉडेल, मुख्याधिकारी प्रशासक म्हणून ठरतायेत फेल…
अमळनेर:- शहरातील तांबेपुरा, सानेनगर, रामवाडी भागात पायी जाण्यासाठी ही रस्ता नसल्याने लोकप्रतिनिधींनी या भागात गाडी चालवून दाखवल्यास करणार जाहीर सत्कार करणार असल्याच्या संतप्त भावना रहिवाश्यांनी व्यक्त केल्या आहेत.

शहरातील तांबेपुरा, सानेनगर, केशव नगर, रामवाडी, बंगाली फाईल, आणि यांना जोडणारी पुढील गावे ही दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या देशात समाविष्ट झाली आहेत का ? असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी विचारला आहे. नुकतीच अमळनेर नगर पालिकेने कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केले मात्र कर वसुली करतांना आपण त्याबदल्यात नागरिकांना काही सुविधांचे देणे लागतो याचा विसर पडलेला दिसतोय. प्रशासक म्हणून मुख्याधिकारी नेरकर हे फेल ठरण्याचे दिसत आहे.

शहरातील धनदांडगे राहत असलेल्या ठराविक भागामध्ये नको तेवढा विकास होत असून इतर जनसामान्य राहत असलेला भाग पूर्ण भकास अवस्थेत जात आहे. या भागात येण्या जाण्यासाठी एखादी पायवाट ही शिल्लक राहिलेली नाही. पावसाळ्यात कुठे रस्ता आहे आणि कुठे डबके हेच मुळात समजत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांनी रस्त्याबाबत ओरड आहे. मात्र त्यांवर उपाय काढण्यात नगरपरिषद फेल ठरली आहे. जवळच विप्रो असल्यामुळे अवजड वाहने इकडून वापरत असतात, आणि रस्ता नसल्यामुळे कॉलनी परिसरातून वाट काढली जाते. त्यात जे उरले आहेत ते रस्तेही धाराशाही होतात. जवळच बोरी नदी आहे तिथून अवैध रेती वाले रात्री बेरात्री कॉलनी परिसरातून सुसाट वाहने नेतात. मोठमोठे डंपर या नसलेल्या रस्त्यावरून नेली जातात, त्यामुळे मोठमोठे खड्डे याठिकाणी झाले आहेत.
या परिसरातील नागरिकांनी नगरपरिषदेला व आमदारांना वारंवार लेखी निवेदन दिले. परंतु आजवर कोणीही या भागाकडे लक्ष घालून साधा मुरुम टाकून रस्ता समतल केला नाही. लवकरच शाळा, कॉलेज सुरू होतील विद्यार्थ्यांची ये जा या भागातून मोठ्या प्रमाणात आहे, निदान उद्याच्या भविष्यासाठी तरी रस्त्याची दुरुस्ती करा अशी विनवणी या नागरिकांनी केली आहे.
असमतोल विकासाचे अनोखे मॉडेल…
अमळनेर नगरपरिषद क्षेत्रात काही भागात रस्त्यावर रस्ते, लाखोंचे पथदिवे उभारण्यात आले आहेत. मात्र इतर भागात पायी चालण्याजोगे रस्तेही उरलेले नाहीत. पथदिवे तर नावालाच आहे. शिरपूर वरून बदली होऊन येणारे मुख्याधिकारी अमळनेरचा पण शिरपूरसारखा विकास करतील अशी अपेक्षा ठेवणाऱ्या नागरिकांचा अपेक्षाभंग झाला आहे.
प्रतिक्रिया…
वेळोवेळी नगरपरिषद व लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन ही रस्त्याची परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे नागरिकांनी आता कोणाकडे दाद मागावी हा प्रश्न असून आमरण उपोषण हाच पर्याय उरला आहे. –उत्कर्ष पवार, नागरिक




