
पालिकेने सार्वजनिक बांधकाम खात्याला नोटीस देऊन रस्ता दुरुस्ती करून देण्याचे दिले पत्र…
अमळनेर : सार्वजनिक बांधकाम खात्याने त्यांचा नादुरुस्त रस्ता दुरुस्तीसाठी विना परवानगी पालिकेचा रस्ता खराब करून नागरिकांची गैरसोय केल्याचा प्रकार शहरात घडला असून पालिकेने सार्वजनिक बांधकाम खात्याला नोटीस देऊन रस्ता दुरुस्ती करून देण्याचे पत्र दिले आहे.

अमळनेर हुन शिंदखेडा जाणारा राज्य मार्ग सहा वर केले यांच्या घराजवळ मोठा खड्डा अनेक दिवसांपासून पडला होता. याठिकाणी अनेक अपघात झाले होते. नागरिकांचे कंबरडे मोडून वाहनांचे देखील नुकसान होत होते. हा रस्ता हायब्रीड एन्यूटी अंतर्गत आहे. तीच यंत्रणा त्याची देखभाल दुरुस्ती करते आणि स्थानिक म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नियंत्रण ठेवतात. गेल्या कित्येक महिन्यांपासून या रस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने अखेर काँग्रेसने भल्या मोठ्या खड्ड्यात वृक्षारोपण केले होते. त्यानंतर खड्डा दुरुस्तीसाठी काम सुरू करण्यात आले.

मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने नगरपालिकेची परवानगी न घेता सर्व अवजड वाहतूक प्रभाग सहा मधील राजगड अपार्टमेंट ते स्वामी विवेकानंद स्कूल मार्गे गल्लीतून वळवण्यात आली. राज्य मार्गावरून जाणारी सर्व अवजड वाहने , नरडाना सिमेंट फॅक्टरीत जाणारी बँकर्स याच प्रभाग सहा मधून जाऊ लागली. नेमके त्याच रस्त्याचे काम पालिकेने सुरू केले होते. काम सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतूक वळवून रस्त्याची खराबी तर केली. पण क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहने गेल्याने अनेकांची पायीपलाईन फुटून नागरिकांचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी पालिकेवर रोष व्यक्त केला. अखेर मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याना पत्र दिले आहे की वाहतूक वळवल्यामुळे कॉलनीतील रस्ता खराब झाल्याने अपघात होण्याची शक्यता असून वळण रस्त्याचे काम तातडीने हाती घ्यावे व कॉलनीतील वाहतूक इतरत्र मार्गाने वळवावी आणि खराब झालेला रस्ता दुरुस्त करून द्यावा.
सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्व परवानगी न घेता रस्ता वळता केल्याने स्थानिक नागरिकांना त्रास होत आहे. फुटलेल्या पाईप लाईन जोडणे पालिकेने सुरू केले आहे.- तुषार नेरकर , मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद




