
वैयक्तिक गटात जिल्ह्यात पहिली तिन्ही बक्षिसे अमळनेर तालुक्याने मिळवली
अमळनेर : शासनाच्या जलजागर जलसंधारण स्पर्धेत संस्था गटात तालुक्यातील पिंपळे येथील धरती माता बचत गटाचा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक आला आहे. तर वैयक्तिक गटात जिल्ह्यात पहिली तिन्ही बक्षिसे अमळनेर तालुक्याने मिळवली आहेत.

शासनाने ग्रामीण भागात सिंचनक्षमता वाढवण्यासाठी पाझर तलाव पुनर्भरण , जलतारा , पावसाचे पाणी साठवणे , गाळ काढणे , बंधारा बांधणे याबाबत संस्था गटात आणि वैयक्तिक गटात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संस्था गटात जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील खिरोदा ग्रामपंचायतीने बंधारा बांधला असून त्यांचा प्रथम क्रमांक मिळाला आहे. तर अमळनेर तालुक्यातील पिंपळे येथील धरती माता बचत गटाचा द्वितीय क्रमांक आला आहे. या बचत गटाने पाणी फौंडेशनच्या मार्गदर्शनाने ग्रामपंचायत , पंचायत समिती , मारवड विकास मंच यांच्या मदतीने गावात योग्य जागा निवडून नाला खोलीकरण , तलाव खोलीकरण , जलतारा खड्डे बनवले भूस्तर आणि पाण्याचा निचरा चांगला असे उत्कृष्ट काम केले. तिसरा क्रमांक केशव स्मृती प्रतिष्ठांन ला मिळाला आहे. त्यांनी वनराई बंधारा बांधला आहे.

त्याचप्रमाणे वैयक्तिक गटात प्रथम क्रमांक अमळनेर तालुक्यातील म्हसले येथील भीमा दौलत शिरसाठ याना मिळाला असून त्यांनी उत्कृष्ट जलतारा व पुनर्भरण खड्डा तयार केला. दुसरा क्रमांक पिंपळे येथील रवींद्र एकनाथ पाटील यांना मिळाला आहे. त्यांनी जलतारा आणि पुनर्भरण खड्डा तयार केला आहे. तर तिसरा क्रमांक प्रमिलाबाई पुंडलिक पाटील रा सडावण याना वैयक्तिक शेततळे बनवंल्याबद्दल तिसरा क्रमांक मिळाला आहे.
पिंपळे येथे मारवड विकास मंचच्या आर्थिक सहाय्याने आणि ग्रामस्थांच्या लोक सहभागाने मिळून हे काम करण्यात आले असून, या प्रकल्पाचे नियोजन व अंमलबजावणीमध्ये प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील , सर्व सदस्य व धरती माता, व सर्व ग्रामस्थ यांच्या नेतृत्वाखाली अनेक जबाबदार व्यक्तींचे अथक प्रयत्न मोलाचे ठरले आहेत. दानशूर व्यक्तिमत्व कामगार आयुक्त विजय चौधरी व मारवड विकास मंच ,सेवा संयोग संस्था, वृषालीताई पटवर्धन आणि लोक वर्गणीतून प्रयत्नशील व्यक्तींच्या एकजुटीमुळे जलमृदा संधारणेचे हे मोठे कार्य यशस्वी झाले आहे.




