
अमळनेर : शहरातील तांबेपुरा सानेनगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर विप्रोजवळ रेल्वे बोगद्याखाली रेल्वे प्रशासनाने नुकताच ‛या पुलातून वाहन चालविण्यास मनाई आहे’ असा फलक लावल्याने हा रस्ता बंद होणार का अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान २० रोजी विप्रो कंपनीच्या नवीन प्लांट च्या उदघाटनला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येणार असल्याची वृत्त असून ते याच रस्त्याने जाणार असल्याचे समजते.

गेल्या कित्येक वर्षांपासून तांबेपुरा ,सानेनगर , अंतुर्ली ,रंजाणे ,तासखेडा ,नंदगाव , लडगाव, अंबारे ,खापरखेडा , करणखेडा , मुडी प्र अमळनेर आदि गावांना शहराशी जोडणारा रस्ता विप्रो कंपनीसमोरून रेल्वे बोगद्याखालून सुरू आहे. हा बोगदा कागदोपत्री नाला म्हणून आहे. शहरातील वाहून जाणारे पाणी याच बोगद्यातून पुढे बोरी नदीला मिळते. मात्र आतापर्यंत सर्व वाहतूक याच मार्गाने होत होती. विप्रो कंपनीत येणारे ट्रक देखील याच बोगद्यातून येत होते. काही दिवसांपूर्वी मोठ्या वाहनांसाठी हा रस्ता बंद करून फक्त लहान वाहनांसाठी सुरू ठेवण्यात आला. आता तर बोगद्यावर रेल्वे प्रशासनाने वॉटर वे ब्रिज नो ट्रेस पासिंग असे लिहिले असून भिंतीवर या पुलातून वाहन चालविण्यास मनाई आहे अशा सूचना लिहिल्या आहेत.

शहरातून मोठी वाहने विप्रो कंपनीत येण्यासाठी प्रताप कॉलेज कडून यावे लागते. पुलाखाली उतरल्यावर मोठे वाहन वळवण्यास दहा मिनिटे लागतात. आणि सध्या हा रस्ता गायत्री नगर भागात अतिशय खराब झाला असल्याने चिखल व खड्डे पडले आहेत. नवीन काँक्रीट रस्त्याला मंजुरी मिळाली आहे परंतु रस्ता होण्यास बराच कालावधी जाईल.
विप्रो कंपनीच्या नवीन प्लांट च्या उदघाटनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार २० रोजी येणार असल्याची चर्चा असून यासंदर्भात विप्रो आणि प्रशासनाच्या बैठका सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांना विप्रो कंपनीत येण्यासाठी रेल्वेचा बोगदा अथवा हेलिकॉप्टर हे दोनच पर्याय असतील. रस्त्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणायचे असतील तर त्यांच्या सोबत फायर फायटर , रुग्णवाहिका सुद्धा असतात. मनाई असलेल्या रस्त्यावरून मुख्यमंत्र्यांना नेले जाईल का ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यापूर्वी देखील दगडी दरवाजाचा बुरुज कोसळला होता तेव्हा मुख्यमंत्री फडणवीसच होते मात्र त्यांची व्हॅनिटी व्हॅन शहरात आणणे अशक्य झाल्याने अखेर त्यांना फरशी रोडवरून परत जावे लागले होते. यंदा पुन्हा या मनाई केलेल्या रस्त्याचा प्रश्न उदभवू शकतो. प्रशासनाने त्वरित मार्ग काढण्याची मागणी होत आहे.
रेल्वे बोगदा वाहतुकीला बंद केल्यास वरील सर्व गावाच्या नागरिकांना फेरा घेऊन शहरात यावे लागेल. तांबेपुरा सानेनगर भागात आग लागली तर किमान अर्धा तास अग्निशमन दल पोहचू शकणार नाही. किमान बोगद्यातून लहान वाहन जाऊ शकेल म्हणून बोगदा वाहतुकीला सूरु राहू द्यावा अशी मागणी पुढे येत आहे.




