
प्रशासनातील काही खिसेभरु अधिकारी स्वार्थासाठी तरुणांना दाखवतायेत वाममार्ग…
रातोरात श्रीमंत होणाऱ्या स्पर्धेमुळे गावागावात वाढली ट्रॅक्टर, डंपरची संख्या…
अमळनेर:- तालुक्यात गेल्या दोन वर्षात वाळूचोरीचे प्रमाण वाढले असून प्रशासनातील काही खिसेभरु व भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे तालुक्याचा बिहार होत असून या अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींचा ही वचक उरला नाहीये. भ्रष्ट अधिकाऱ्यांनी ही वाट खुली केल्याने अनेक तरुण हे वाममार्गाला लागले आहे.

गेल्या वर्षभरात तीनही नदीकाठच्या गावात वाढली ट्रॅक्टर, डंपर व जेसीबी घेण्याच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून रातोरात पैसे मिळत असल्याने दोन नंबरच्या धंद्याचे आकर्षण तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. वाळू चोरणारे हे तरुण आता दादा भाई म्हणून घेऊन टोळी मिरवत गुंडागर्दी करत असून त्यामुळे संघटित गुन्हेगारीत वाढ झाली आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांचा हफ्ता ठरवून दिल्यास कोणताच त्रास होत नसल्याने अनेकांनी लोन काढत वाहने खरेदी केली आहेत. तर काही दुसऱ्याच्या ट्रॅक्टर डंपरमध्ये पार्टनर झाले आहे. त्यामुळे तालुक्यात ट्रॅक्टरच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. प्रशासनातील काहींनी तर माफियांसोबत पार्टनरशीप केली असून त्यामुळे अधिकारी कुठ जातोय ? याची खबर वाळू माफियांना सर्वात आधी पोहचते. मात्र हाच वाळूचोरीचा धंदा करायचा आणि झटपट श्रीमंत व्हायचं हे आकर्षण अनेक तरुणांना भविष्यातल्या बरबादीकडे नेत आहे. यासाठी हे हफ्तेखोर अधिकारी कारणीभूत असून तालुक्याला लागलेल्या किडीचे मोठ्या संसर्गात रूपांतर होत आहे. लोकप्रतिनिधींचा धाक अधिकाऱ्यांवर उरलेला नसून काही अधिकारी स्वतःला तालुक्याचा बॉस समजून बेछुटपणे वागत आहेत. या अधिकाऱ्यांची उचलबांगडी न केल्यास तालुक्याचा सत्यानाश होणार असून त्यात आपलेही नुकसान होणार असल्याचे लोकप्रतिनिधींनी समजून घेणे गरजेचे आहे.




