
२६ प्रकरणे पुराव्यासह तहसिलदारांकडे पाठवल्याची उपविभागीय अधिकाऱ्यांची माहिती, मात्र कारवाईची प्रतीक्षा…
अमळनेर : बनावट शेतकरी दाखल्यांची चौकशी करून संबंधित सेतू चालकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच बनावट दाखल्यांनी झालेल्या बनावट खरेदी नोंदी रद्द कराव्यात अशी मागणी काँग्रेसने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.

उपविभागीय अधिकाऱ्यांनी कुळ कायदा कलम ८४(क) प्रमाणे कारवाई करण्याचे आदेश देऊनही अद्याप काहीच कारवाई न झाल्याने काँग्रेसचे हर्षल जाधव , युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव तुषार संदानशिव , युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेश पाटील तसेच जिल्हा सचिव पंकज पाटील यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. अमळनेर तालुक्यात नाम सदृश्य उतारे शोधून शेतकरी दाखले देऊन त्यावर शेतकऱ्यांच्या सुपीक जमीन खरेदी करण्यात आल्या आहेत. तसेच काही बनावट उतारे तयार करून व्यापाऱ्यांना शेतकरी दाखवण्यात आले आहेत. याची सखोल चौकशी करून तात्काळ सेतू चालकाचे लायसन्स रद्द करण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान पुराव्यासह २६ प्रकरणे तहसीलदारांकडे पाठवल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले असून तहसीलदार माहिती मागवल्याचे सांगत कारवाईला विलंब का करत आहेत ? असा सवाल विचारला जात आहे.
प्रतिक्रिया
२६ प्रकरणे कागदपत्रांच्या पुराव्यासह तहसिलदारांकडे पाठवले आहेत. त्यात चार प्रकरणे बनावट दाखले व उतारे यासह दिले आहेत. यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.– नितीनकुमार मुंडावरे ,उपविभागीय अधिकारी ,अमळनेर
प्रतिक्रिया
मंगरूळ येथील तक्रारीची सुनावणी सुरू असून त्यात खरेदी पलटवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे मात्र त्यात खात्री केली जाईल. तसेच इतर प्रस्ताव तपासून या बनावट दाखल्यांवर खरेदी झाली किंवा नाही याबाबत दुय्यम निबंधकाकडून माहिती मागवण्यात आली आहे.–रुपेशकुमार सुराणा ,तहसीलदार अमळनेर.




