
महाविकास आघाडीच्या आंदोलनाला उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांची भेट
अमळनेर: तालुक्यात सध्या खरीप हंगाम सुरू असून, मका, कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, उडीद मूग यांसारख्या पिकांसाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांची गरज निर्माण झाली आहे. मात्र याच काळात तालुक्यात कृत्रिम खतटंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

महाविकास आघाडीतर्फे प्रा. सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली १ जुलै रोजी तहसिल कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी याबाबत अनेक जणांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी भेट दिली. यावेळी अनेक जणांनी समस्या मांडल्या. त्यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी यांनी आजचा साठा सादर केला. लिंकिंग बाबतही तक्रार केली. यावेळी संबंधित शेतकऱ्यांनी समस्या मांडल्या त्या देखील समजून घेतल्या. नंतर जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि कृषी विस्तार अधिकारी यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात खत विक्रेत्यांकडून होत असलेल्या अवाजवी दरवाढीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात काही अधिकृत वितरक व दुकानदारांनी कृषी खात्याच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांशी संगनमत करून युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला आहे. अधिकृत दर २६६.५० रुपये असताना, हेच खत ३०० ते ३५० रुपये दराने विकले जात आहे. खरीप हंगामात मका पिकासाठी युरियाची मोठी मागणी असते. मात्र गरजेच्या वेळी खत उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत.
महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी याआधी २४ जून रोजी तहसीलदार व प्रांत अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करत, प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.
“शासनाने तात्काळ लक्ष घालून अमळनेर तालुक्यात खतांचा योग्य आणि पुरेसा पुरवठा करावा. तसेच कोणत्याही शेतकऱ्याची आर्थिक लूट होणार नाही, याची खातरजमा शासकीय यंत्रणांनी करावी,” अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता जिल्हा व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करून खत विक्रीतील भ्रष्टाचार रोखावा, अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत.

युरियाचा साठा मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे. कोणाला खत मिळत नसेल त्यांनी आपला नंबर देऊन सांगितले की मी खत आहे की नाही याची खात्री करेल. आपल्याला नेहमी सहकार्य करेल असे आश्वासन यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे यांनी उपस्थितांना दिले.
हे आंदोलन प्रा. सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाले असुन त्यात माजी आमदार डॉ बी.एस.पाटील, जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, शिवसेनेचे विजय पाटील, संदीप घोरपडे, प्रताप पाटील, योजना पाटील, प्रा. अशोक पवार, धनगर पाटील, बन्सीलाल भागवत, प्रा. शाम पवार, रज्जाक भाई, मनोहर पाटील, दिनेश पवार, अशोक पाटील आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.




