
अमळगाव येथे पारायण प्रसंगी विद्याताई पडवळ यांचे मार्गदर्शन…
अमळनेर:- दि. १६ जुलै रोजी तालुक्यातील अमळगाव येथे आध्यात्मिक पारायण सोहळा संपन्न झाला. सौ. विद्याताई पडवळ यांच्या सुस्वर आवाजातील मुखोद्गत पारायण हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता भूषण चौधरी व गायत्री चौधरी या दांपत्याच्या निवासस्थानी गजानन महाराजांची आरती करून झाली. त्यानंतर भव्य शोभायात्रेच्या माध्यमातून लता रमण हॉल, जळोद रोड येथे समारोप झाला. यावेळी अमळगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात दर्शन घेऊन सकाळी ८ वाजता पारायणास प्रारंभ झाला. सौ. पडवळ यांनी दासगणू महाराज रचित “श्री गजानन विजय ग्रंथ” मुखोद्गत वाचनाद्वारे उपस्थितांना गजानन महाराजांचे तत्वज्ञान, उपदेश आणि जीवनमूल्ये अत्यंत हृदयस्पर्शी पद्धतीने सांगितली. “अन्नाचा प्रत्येक कण, पाण्याचा प्रत्येक थेंब ही दैवी देणगी आहे. त्यांचा अपमान म्हणजे देवाचा अपमान,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. या प्रसंगी अमळगाव, खेडी, मेहरगाव, पिंगळवाडे, अमळनेर, रडावण, सडावण, सुमठाणे, रत्नाप्रिंप्री, कावप्रिंप्री तसेच नाशिक व पंचक्रोशीतील विविध गावांमधून भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुमारे ३०० भाविकांनी एकदिवसीय पारायणाचा भक्तिपूर्ण लाभ घेतला. कार्यक्रमानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम श्री संत गजानन महाराज भक्त परिवार, अमळगाव आणि ग्रामस्थ मंडळी, महिला, युवक-युवती आणि ज्येष्ठ नागरिकांच्या परिश्रमातून अत्यंत यशस्वीपणे पार पडला.




