
अमळनेर : तालुक्यातील चांदणी कुऱ्हे गावात अज्ञात चोरट्यांनी ३० रोजी रात्री चार घरे फोडून सुमारे १५ ते २० ग्रॅम सोने व एक लाख रुपये चोरीस नेल्याची घटना घडली.
कुऱ्हे येथील सुरेश राजाराम पाटील यांची पत्नी आणि पुतणी घरात झोपलेली असतांना घर लांबलचक असल्याने चोरट्यानी मागच्या लोखंडी दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि घरातल्या कपाटातील साहित्य चोरून नेले. तर अर्जुन गणपत पाटील आणि रवींद्र भिका पाटील यांची बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून त्यांच्याही घरातील सामान अस्ताव्यस्त फेकला आणि चोरी केली. तसेच आणखी एक महिला तिच्या घरात झोपली असताना तिच्याही घरात प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याठिकाणी काहीच मिळाले नाही. चोरीची माहिती प्राप्त होताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर , उदय बोरसे आणि फॉरेन्सिक पथक , श्वान पथक याना घटनस्थळी पंचनाम्याला पाठवले. प्राथमिक स्वरूपात १५ ते २० ग्रॅम सोने आणि एक लाख रुपये चोरीला गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करणे सुरू होते. दरम्यान फॉरेन्सिक प्रयोगशाळा पथकाने विविध ठिकाणाहून ठसे आणि काही माहिती गोळा केली.




